५ जुलै वार्ता: आगामी काळात भाजपामध्ये मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आतापासूनच प्रत्येक आमदारांची झाडाझडती सुरू केली आहे. त्याचा एक भाग म्हणून भाजपा सर्व आमदारांना थेट त्यांच्या कामगिरीचे रिपोर्ट कार्डच दिले जाणार आहे. जे आमदार कच्चे आहेत, त्यांची कान उघाडणी केली जाणार आहे. तसेच जे आमदार कच्चे आहेत, त्यांच्या मतदारसंघात पर्याय देण्यावरही भाजपाकडून विचार केला जात आहे. त्यामुळे ‘ढ’ आमदारांना भाजपाकडून नारळ दिला जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. सध्या राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी पाऊसच पडलेला नाही. त्यामुळे आमदार मतदारसंघात जाऊन तेथील नागरिकांची म्हणणे ऐकून घेणार आहेत. मतदारसंघात जाऊन परिस्थितीची पाहणी करणार आहेत. मात्र, त्यानंतर भाजपने सर्व आमदारांना १८ ऑगस्ट रोजी मुंबईत पोहचण्याचे आदेश दिले आहेत. भाजपाच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात ही बैठक पार पडणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून असणार आहे. प्रदेश कार्यालयात होणाऱ्या या बैठकीत भाजपा १०६ आमदारांच्या हाती त्यांनी केलेल्या कामांची ‘मार्कशीट’ दिली जाणार आहे. कोणत्या आमदाराची कशी कामगिरी कशी आहे? प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघातील सर्वे काय म्हणतो यावरही चर्चा होणार आहे. कोण कुठे कमी तर कोण कुठे मागे? हे यातून स्पष्ट होणार आहे. आमदारांच्या ४ वर्षातील कारकिर्दीची ही मार्कलिस्ट तयार करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.