Home राजकारण भाजपच्या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटात प्रवेश

भाजपच्या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटात प्रवेश

84

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपच्या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला आहे. केंद्रीय मंत्री खासदार कपिल पाटील यांच्या समर्थकांनी ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी स्वत: या सगळ्यांना शिवबंधन बांधत पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी हा पक्षप्रवेश झाला. यावेळी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधवही उपस्थित होते. राज्यातील सत्तांतरानंतर दिवसेंदिवस ठाकरे गटाला मोठी गळती लागली आहे. गेल्या नऊ -दहा महिन्यात शेकडो जणांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. पण आता त्यांच्याबद्दल असलेल्या सहानभुतीमुळे अनेकजण पुन्हा ठाकरे गटात प्रवेश करु लागल्याचे दिसत आहे.

उद्धव ठाकरे यांच्या सर्वसमावेशक विचारांवर विश्वास ठेवत आपण पक्षप्रवेश करत असल्याची भावना यावेळी या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. यावेळी, शहापूर तालुका उपाध्यक्ष तेजस पडवळ, तालुका उपाध्यक्ष प्रमोद निचिते, भाजप युवा मोर्चा ठाणे जिल्हा ग्रामीण सरचिटणीस शशांक गुरुनाथ हरड, ग्रामपंचायत खरीवली सरपंच नीता वातेस, उपसरपंच शिवानी शशांक हरड यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या शेकडो कार्यकर्ते आणि समर्थकांसह शिवबंधन बांधून ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश घेतला.