१३ नोव्हेंबर वार्ता: पैठणी साडी, घोंगडी, हिमरू, करवत काठी आणि खण फॅब्रिक या पारंपरिक वस्त्रोद्योगांना पारंपरिक वस्त्रोद्योग म्हणून राज्यशासनाने मान्यता दिली आहे. या वस्त्रोद्योगांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी नोंदणीकृत विणकरांना गणेशोत्सवाच्या निमित्ताने उत्सव भत्ता देण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरणाच्या अंतर्गत राज्यशासनाकडून हा भत्ता दिला जाणार आहे.
महाराष्ट्रातील वस्त्रोद्यागाला प्राचीन काळापासून प्रदीर्घ इतिहास आहे. कापूस, रेशीम, लोकर यांसह विविध प्रकारच्या सामग्रीपासून ही वस्त्रे सिद्ध केली जातात. हे वस्त्रोद्योग उपजीविकेचे निश्चित साधन झाल्यास विणकरांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर रोखता येईल. त्यामुळे या वस्त्रोद्योगांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेतून नोंदणीकृत विणकर असलेल्या पुरुषांना १० सहस्र रुपये, तर महिलांना १५ सहस्र रुपये उत्सव भत्ता दिला जाणार आहे. वर्ष २०२३-२४ या वर्षी हा भत्ता मकरसंक्रांतीला, तर वर्ष २०२४-२५ पासून गणेश चतुर्थीनिमित्त दिला जाणार आहे.