सावंतवाडी प्रतिनिधी: दि. २१ फेब्रुवारी २०२३ रोजी नासिर शेख रा. न्यू सालईवाडा, मोरडोंगरी, सावंतवाडी यांनी सावंतवाडी बाजारात एका युवकाला अडवून त्याच्या छातीला पिस्तूल रोखल्या प्रकरणी त्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. अशा प्रकारचे निवेदन सावंतवाडी पोलीस स्टेशनला सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांनी दिले आहे.
रवी जाधव यांनी निवेदनात म्हटले आहे की, २१ फेब्रुवारी २०२३ रोजी पिस्तूलीचा गैरवापर करून आठवडा बाजारपेठेमध्ये पेट्रोल पंपाच्या अगदी बाजूला एका युवकाला अडवून स्वतः त्या युवकावर हल्ला करून त्याच्या छातीवर पिस्तूल रोखल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. असे आपणास निवेदन देण्यात आले होते. परंतु ६ दिवस होऊन गेले तरी अद्यापही सदर व्यक्तीवर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. किरकोळ वादातून पिस्तूल दाखवून ब्लॅकमेल करण्याचे प्रकार त्याच्याकडून वारंवार घडत असतात. अशी नागरिकांनी माहिती दिली आहे. तसेच बाजारपेठेमध्ये गोरगरीब भाजी विक्रेते व फळे विक्रेते यांना दमदाटी करून आपल्या लोकप्रतिनिधी पदाचा गैरवापर करून हप्ते वसूल करणे, दहशत निर्माण करून नागरिकांना त्रास देणे, महिलांची छेडछाड करणे, अवैद्य धंदे करणे ही त्याची सवय झालेली आहे. आणि याही अगोदर गरोदर महिलेच्या पोटात लाथ मारून तिला ठार मारण्याचा प्रयत्न करणे, एका महिलेवर काळोखात हल्ला करणे असे विचित्र प्रकार त्याच्याकडून घडत आहेत. त्याची नोंद पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा आहे. त्याची व इतर गुन्ह्यांची नोंद निवेदना सोबत जोडत आहे. या शहरामध्ये गुंड प्रवृत्ती नाहीशी व्हावी यासाठी माझे प्रयत्न आहेत. आणि अशी लोकं सावंतवाडीची शांत संस्कृती बिघडवण्याचे प्रयत्न करत आहेत. अशी माहिती निवेदनाद्वारे सावंतवाडी पोलीस स्टेशनला देत पुढे संबंधित व्यक्तीचे पिस्तुल जप्त करून त्याचे लायसन रद्द करावे आणि सदर व्यक्तीस सावंतवाडीतून हद्दपार करावे. असे न झाल्यास ६ मार्च २०२३ रोजी सावंतवाडी पोलीस स्टेशनच्या समोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांनी दिला आहे.