Home स्टोरी पर्यटन विकासात योगदान द्या, प्रतिमास ३५ सहस्र रुपये शिष्यवृत्ती मिळवा! महाराष्ट्र शासनाची...

पर्यटन विकासात योगदान द्या, प्रतिमास ३५ सहस्र रुपये शिष्यवृत्ती मिळवा! महाराष्ट्र शासनाची नाविन्यपूर्ण योजना

61

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: राज्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी नवीन दृष्टीकोन आणि तंत्रज्ञानाची आवड असलेल्या तरुणांना महाराष्ट्र पर्यटन महामंडळाकडून प्रतिमास ३५ सहस्र रुपये शिष्यवृत्ती आणि ५ सहस्र रुपये प्रवासभत्ता दिला जाणार आहे. या शिष्यवृत्तीसाठी १५ मे पर्यंत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या महाव्यवस्थापकांच्या नावे ‘gm@maharashtratourism.gov.in’ आणि ‘dgm@maharashtratourism.gov.in’ या संकेतस्थळांवर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन पर्यटन विभागाकडून करण्यात आले आहे.पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली ही योजना राबवण्यात येणार आहे. यामध्ये पर्यटन क्षेत्रातील अभ्यास, संशोधन, सेवा, पर्यटनप्रेमी संस्थांना जोडणे, त्यांना प्रशिक्षित करणे आदींचा समावेश आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून व्यवसाय विकास, विपणन, ‘रेस्टॉरंट ऑपरेशन्स’, जलपर्यटन, ‘टूर पॅकेजेस’, पर्यटनाविषयी प्रशिक्षण, पर्यटन क्षेत्राच्या ठिकाणी पायाभूत सुविधा आदी साध्य करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. निर्मिती, ‘ब्रँडिंग’, ‘डिजिटल मार्केटिंग’, प्रसिद्धी, आंतरराष्ट्रीय संबंध आदी विविध क्षेत्रांतील तज्ञ युवकांच्या दृष्टीकोनांचा लाभ या उपक्रमाद्वारे पर्यटनाच्या विकासासाठी करून घेण्यात येणार आहे. या शिष्यवृत्तीसाठी २१ ते २६ वर्षे वयाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये कोणत्याही शाखेतील प्रथम श्रेणीप्राप्त पदवीधारकांना प्राधान्य असणार आहे. शिष्यवृत्तीसाठी उमेदवाराला किमान एका वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.