Home स्टोरी न्हावेली सोनुर्ली परिसरात बीएसएनएल सेवेचा बट्ट्याबोळ…!

न्हावेली सोनुर्ली परिसरात बीएसएनएल सेवेचा बट्ट्याबोळ…!

133

सावंतवाडी: मागील काही दिवासांपासून न्हावेली सोनुर्ली आरोस पंचक्रोशीत बीएसएनएलच्या ब्रेकडाऊन नेटवर्कमुळे येथील जनतेचे हाल होत आहेत. वारंवार तक्रार करून देखील बीएसएनएल अधिकाऱ्यांचा यावर दुर्लक्ष होत आहे. या बाबतच्या तक्रारी आज न्हावेली रेवटेवाडीतील सामाजिक कार्यकर्ते तथा सिंधुदुर्ग स्वाभिमान संघटनेचे न्हावेली मळेवाड विभाग समन्वयक संदेश सावंत यांच्याकडे रहिवाशानी केल्या असून त्या अनुषंगाने येत्या दोन दिवसात सदर गावात बीएसएनएल सेवा सुरळीत न झाल्यास न्हावेली आरोस सोनुर्ली गावातील ग्रामस्थांसहित बीएसएनएल जिल्हा प्रबंधक श्री रविकिरण जन्नू यांना घेराव घालण्यात येणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते तथा विभाग समन्वयक श्री सावंत म्हणाले. पंचक्रोशीतील बीएसएनएल सेवा सुरळीत नसल्यामुळे विद्यार्थी व बीएसएनएल ग्राहकांचे हाल होत आहेत. आजही कित्येक युवक वर्क फ्रॉम होम करीत आहेत तर पुढे काही दिवसातच दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू होत असून विद्यार्थी सुद्धा ऑनलाईन अभ्यास करीत आहेत. बीएसएनएलच्या या अनागोंदी कारभारामुळे या विद्यार्थी वर्गाचे मोठ नुकसान होत असून याची जबाबदारी बीएसएनएल आपल्या डोक्यावर घेणार की रिचार्जच्या माध्यमातून फक्त पैसाच गोळा करणार असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

 

तरी येत्या दोन दिवसात सेवा सुधारा अन्यथा पुढील होणाऱ्या परिणामास तयार रहा असा इशारा सिंधुदुर्ग स्वाभिमान संघटनेचे न्हावेली मळेवाड विभाग समन्वयक तथा सामाजिक कार्यकर्ते श्री सावंत यांनी जिल्हा प्रबंधक श्री रविकिरण जन्नु यांना दिला आहे. तर जिल्हा प्रबंधक रविकिरण जन्नू यांच्याशी संपर्क साधला असता आज त्या ठिकाणी टेक्निकल टीम दाखल होणार असल्याचे त्यांनी माहिती दिली आहे.