नोव्हेंबर-डिसेंबर, २०२२ दरम्यान अन्न व औषध प्रशासनातील १६ अन्न सुरक्षा अधिकारी गट ब यांना सहाय्यक आयुक्त (अन्न) गट अ या पदावर पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली. यामध्ये यो. हि. ढाणे या अधिकाऱ्यास नियमांचा भंग करुन पदस्थापना देण्यात आली असल्याची बाब समोर आली आहे. या नियमाच्या नियम ६ (२)नुसार महसूल वाटपाच्या वेळेस भरलेली पदे वगळून रिक्त असलेल्या पदावरच पदोन्नती देणे आवश्यक आहे.असे असतांना ढाणे यांच्या नियुक्तीबाबत मंत्री, अन्न व औषध प्रशासन तथा सक्षम प्राधिकारी यांचेकडे मान्यतेसाठी नस्ती आल्यानंतर भरलेल्या पदावरच ठाणे परीमंडळ -३ येथे नियमबाह्य पदस्थापना देण्यात आली. याप्रकरणी विभागाचे सचिवांनी ढाणे यांची नियमबाह्य पदस्थापना करण्यास नकार दिल्या नंतर उर्वरीत सर्व १५ अधिका-यांचे आदेश २८ नोव्हेंबर २०२२ रोजी शासनातर्फे निर्गमित करण्यात आले. मात्र यावेळेस यो. हि. ढाणे यांचे आदेश जारी करण्यात आले नाही. दरम्यान, ढाणे यांची सोय व्हावी आणि त्यांच्यासाठी पद रिक्त करता यावे म्हणून ठाणे परीमंडळ -३ या पदावर कार्यरत वर्ग एक अधिका-यास अकार्यकारी पदावर बदलीसाठी अर्ज देण्याच्या मौखिक सूचना देण्यात आल्या. या अधिकाऱ्याच्या अर्जानंतर तात्काळ त्यांचे बदली आदेश जारीही करण्यात आले. वर्ग एक अधिका-याची मध्यंतरी (मिड-टर्म) बदली करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संमती घेणे आवश्यक होते. मात्र हे प्रकरण मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे गेल्यास यातील अनियमितता उघडकीस येऊ शकते म्हणून या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवण्यात आले. त्यांच्याकडे फाईल न पाठविताच संबंधित वर्ग एक अधिका-याचे बदली आदेश जारी करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र शासकीय गट अ आणि गट ब पदांवर सरळसेवेने व पदोन्नतीने नियुक्तीसीठी महसूल विभाग वाटप नियम २०२१ च्या नियम १५ चे उल्लंघन करीत ढाणे यांच्या ठाणे परिमंडळ -३ येथे पदोन्नतीने नियुक्तीचे आदेश १४ डिसेंबर २०२२ रोजी निर्गमित करण्यात आले. यामध्ये फार मोठा अर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा विभागात आहे.
पूजा चव्हाण हत्या प्रकरणातील वादग्रस्त शिवसेना नेते आणि अन्न व औषधे प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या संमतीने या विभागात बदल्या आणि नियुक्त्यांमध्ये अनागोंदी सुरू असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.