Home स्टोरी निरवडे गावाला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामध्ये जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त

निरवडे गावाला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामध्ये जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त

58

सावंतवाडी प्रतिनिधी: महिला सरपंच असली की त्यांचे पतीच काम करताना दिसतात. मात्र निरवडे ग्रामपंचायत त्याला अपवाद आहे. येथील महिला सरंपचा सुहानी गावडे या ऍक्टिव्ह आहेत. त्यांनी विकासाचा पायंडा असाच पुढे सुरू ठेवावा, असे कौतुक कोकण विभागाचे उपायुक्त गिरीश भालेराव यांनी आज येथेे केले. दरम्यान निरवडेत झालेली समृध्दी लक्षात घेता हे गाव म्हणजे कोकणातील “राळेगणसिध्दी” असे म्हणता येईल. या ग्रामपंचायतीचा आदर्श अन्य ग्रामपंचातींनी घ्यावा, असेही आवाहन त्यांनी केले. निरवडे गावाला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामध्ये जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. त्यानंतर कोकण विभागासाठी निवड करण्यात आली होती. याबाबतचे मूल्यांकन करण्यासाठी आज विभागीय कोकण उपायुक्त यांची चार सदस्य टीम गावामध्ये दाखल झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात श्री. भालेराव बोलत होते. यावेळी उपविकास चंद्रशेखर जगताप, विभागीय समन्वयक पूजा साळगावकर, विभागीय आयुक्त विठ्ठल लांबोर, उपायुक्त विशाल तनपुरे, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सरपंच सुहानी गावडे, उपसरपंच अर्जुन पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य दशरथ मल्हार, जयराम जाधव, धर्माजी गावडे, अंगारिका गावडे, रेशमा पांढरे, प्रगती शेटकर, आनंदी पवार, माजी सरपंच प्रमोद गावडे, माजी सरपंच हरि वारंग, ग्रामविकास अधिकारी सुनिता कदम, निवृत्त ग्राम विकास अधिकारी मधुकर घाडी, गावातील ग्रामस्थ आदी उपस्थित होते. श्री. भालेराव पुढे म्हणाले, निरवडे ग्रामपंचायतचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. हे पाहून मला आनंद होतो. निरवडे गावाचा अभ्यास करताना माझ्या असे लक्षात आले की, निरवडे गावाला २००८ पासून पुरस्कार मिळण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि आज २०२३ आहे. अविरतपणे हा सुरू केलेला प्रवास आजपर्यंत सुरू आहे. त्याबद्दल माजी सरपंच सदस्य आणि गावातील लोकांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. या ठिकाणी असलेल्या महिला बचत गटाने सुद्धा आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी वेगवेगळे व्यवसाय करणे गरजेचे आहे आणि या ठिकाणी शेतीपूरक व्यवसाय सुद्धा केला तर आपले आर्थिक उत्पन्न वाढेल. आपण आर्थिक सक्षम असलो तरच आपल्याला समाजात स्थान मिळते. त्यामुळे गावातील प्रत्येकाने आपण स्वतः आर्थिक सक्षम होणार असे ठरवा. त्यासाठी लागणारे सहकार्य आम्ही निश्चितच करू. असेही त्यांनी यावे सांगितले. यावेळी सरपंच सौ. गावडे पुढे म्हणाल्या की , निरवडे ग्रामपंचायतला बरेच पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यासाठी या अगोदर असणारे सरपंच उपसरपंच आणि सर्व सदस्य आणि गावातील ग्रामस्थांचे मोठे योगदान आहे. गावात स्वच्छता राहण्यासाठी ग्रामस्थांचे सुद्धा सहकार्य अपेक्षित असते आणि या ठिकाणचे साफसफाईसाठी स्वतःहून समोर येत आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. यापुढे सुद्धा निरवडे गावाला विविध पुरस्कार मिळण्याच्या दृष्टीने मी आणि सर्व सदस्य काम करणार आहोत अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. वारंग यांनी केली. ते म्हणाले, मी सरपंच असताना प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामपंचायत कार्यालय गावातील शाळांना रंगरंगोटी करण्यात आली. त्यामुळे त्या ठिकाणचे वातावरण प्रसन्न झाले. त्यानंतर प्रत्येक शाळा डिजिटल करण्यात आली.आता ज्यावेळी आम्ही शाळेत जातो त्यावेळी त्या ठिकाणची मुले विविध उपक्रम करत असतात. ते पाहून आम्हाला समाधान वाटते. निरवडे गावात शेतकरी मेळावा, महिलांसाठी, किशोरवयीन मुली व त्यांच्या मातांसाठी किशोर वयातील बदल या विषयावर व्याख्यान असे बरेच उपक्रम आम्ही या ठिकाणी राबविले आणि त्याला येथील ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद सुद्धा दिला. आणि गावात असलेले स्टेट लाईट सोलर सिस्टिम वर करण्यासाठी आमचा मानस आहे. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. असेही त्यांनी यावेळी सांगितले. आणि पुढील काळात सुद्धा निरवडे गावात विविध उपक्रम राबविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. सावंतवाडी तालुक्यातील ६३ पेक्षा जास्त ग्रामपंचायत असताना या ग्रामपंचातला स्वच्छतेचा पुरस्कार मिळतो. हे आमचं भाग्य आहे. या गावाचा आदर्श इतरही गाव घेत आहेत. याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही यापुढे सुद्धा असेच काम करत राहू. असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद शाळा नंबर १, हेल्थ सेंटर, गांडूळ खत प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन, दुग्ध व्यवसाय प्रकल्प, प्राथमिक आरोग्य केंद्र, घरा बाजूला असलेले शोषखड्डे आणि ग्रामस्थांच्या घराच्या आजूबाजूची सफाई याची त्यांनी पाहणी केली.