कोकणात ठाकरे गट आणि राणे कुटुंबीयांकडून एकमेकांवर जोरदार टीका सुरु आहेत. कधी नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत तर कधी वैभव नाईक विरुद्ध नितेश राणे यांच्यातील शाब्दिक चकमक रंगत असल्यामुळे कोकणातील राजकारण वातावरण तापलेलं असतं.आता ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी थेट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला आहे. नारायण राणे यांचं केंद्रीय मंत्रिपद अवघ्या दोन महिन्यात जाणार आहे, असा गौप्यस्फोटच वैभव नाईक यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नाईक यांच्या या विधानामुळे कोकणात पुन्हा एकदा नारायण राणे यांचं मंत्रिपद जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.नेमकं काय म्हणाले वैभव नाईक?येत्या दोन महिन्यात राणेंच मंत्रिपद जाणार आहे. आतापर्यंत इतरांचं राजकीय अस्तित्व ठरविणाऱ्या राणेंच राजकीय अस्तित्व आता भाजप ठरविणार आहे. भाजपला राणेंची राजकीय दृष्टया गरज नाही. त्यामुळे राणेंना राजीनामा द्यावा लागणार आहे, असं वैभव नाईक म्हणाले. यावेळी ईडीच्या चौकश्यांवरून त्यांनी टीका केली. नितेश राणे यांनी अगोदर आपल्या वडिलांना विचारावं की त्यांना ईडीची नोटीस आल्यानंतर पक्ष का बदलला? त्यांना आलेल्या ईडीच्या नोटीसच काय झालं? वडिलांनी नेमका कोणता समझोता केला? हे अगोदर जनतेसमोर आणावं आणि मग इतरांना उपदेश करावा, असा टोला वैभव नाईक यांनी लगावला आहे.