Home स्टोरी नवीन पनवेल येथील घरांवर आढळली आतंकवाद्यांचे समर्थन करणारी भित्तीपत्रके!

नवीन पनवेल येथील घरांवर आढळली आतंकवाद्यांचे समर्थन करणारी भित्तीपत्रके!

156

२६ जून वार्ता: रायगड जिल्ह्यातील नवीन पनवेल परिसरातील काही घरांवर ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या बंदी घालण्यात आलेल्या आतंकवादी संघटनेचे समर्थन करणारी भित्तीपत्रके लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या भित्तीपत्रकांवर ‘पी.एफ्.आय. जिंदाबाद’, असे लिहिण्यात आले आहे. ‘भित्तीपत्रके कुणी लावली ?’ हे अद्याप समजलेले नाही. या प्रकरणी खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात अज्ञातांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.दोन समूहांमध्ये वैमनस्य निर्माण केल्याप्रकरणी भा.दं.वि. कलम १५३ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

२४ जून या दिवशी ही घटना उघडकीस आली. या भित्तीपत्रकांवर इस्लाममध्ये पवित्र समजला जाणारा ‘७८६’ हा क्रमांकही लिहिण्यात आला आहे. भित्तीपत्रकांसमवेत दरवाजाला फटाकेही लावण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक झालेली नसून पोलिसांकडून शोध चालू आहे. आंतरराष्ट्रीय आतंकवादी कारवायांमध्ये सहभाग उघड झाल्यामुळे वर्ष २०२२ मध्ये केंद्रशासनाने ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ वर बंदी घातली होती; मात्र त्यानंतर भारतात या संघटनेचे हस्तक कार्यरत असल्याचेच या घटनेतून दिसून येत आहे.