मसुरे प्रतिनिधी: वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा येथे इयत्ता आठवी मध्ये शिकणारी कुमारी श्रेया समीर चांदरकर हिने एक एक धागा जोडत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा भारतभर विविध रूपामध्ये साकारल्या गेल्या. काहींनी भव्य रांगोळ्या मधून, पेंटिंग मधून, कोलाज चित्रांच्या माध्यमातून तर प्रत्यक्ष शेतामध्ये छत्रपती शिवरायांचे रूप साकारले. परंतु एखाद्या शाळकरी मुलीने विविध रंगीत दोऱ्यांच्या सहाय्याने विणलेले छत्रपती शिवरायांचे चित्र सिंधुदुर्गातच नव्हे तर महाराष्ट्रातील पहिले असावे.
कुमारी श्रेया समीर चांदरकर हिने जवळपास पाच दिवस अथक परिश्रम घेत तिने हे चित्र पूर्ण केले. सध्या दहावी व बारावीच्या परीक्षा असल्यामुळे शाळा एक वेळ भरते. घरी लवकर आल्यामुळे तिने या वेळेचा सदुपयोग करत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारली. यासाठी जवळपास १०० विविध रंगांच्या दोऱ्यांचा वापर तिने केला. यासाठी श्री समीर चांदरकर यांचे मार्गदर्शन लाभले.