Home राजकारण धनंजय मुंडे भावूक, परळीतल्या स्वागताने भारावले, म्हणाले श्वास असेपर्यंत…

धनंजय मुंडे भावूक, परळीतल्या स्वागताने भारावले, म्हणाले श्वास असेपर्यंत…

95

परळीत बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, ‘ प्रभू परळी वैद्यनाथानं मला पुनर्जन्म दिलाय. हे सांगण्यासाठी की पुढचे 10 जन्म तुला मिळाले तरी याच मातीत जन्म घ्यायचा आणि इथलीच सेवा करायची आहे.

कुणाल जायकर, परळी (बीड): कार अपघातानंतर गंभीर जखमी झालेले धनंजय मुंडे मुंबईत उपचारानंतर रविवारी मूळ गावी परळीत पोहोचले. परळीत कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलंय. या स्वागत सोहळ्यात भाषण करताना धनंजय मुंडे भावूक झाले. निवडणूकीत विजयी झाल्यानंतर, मंत्रिपद मिळाल्यानंतर जे स्वागत होत नाही, त्यापेक्षाही जास्त प्रेमाने माझं स्वागत झालं, हे प्रेम मी विसरणार नाही, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले. तसंच परळी वैद्यनाथाच्या कृपेने मला पुनर्जन्म मिळालाय. त्याने म्हटलंय, हा नवा जन्मच नाही तर पुढचे दबा जन्म तुला याच मातीत जन्म घ्यायचाय अन् इथल्या नागरिकांची सेवा करायची, असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी भाषणादरम्यान केलं.

स्वागत करू नका म्हणालो होतो…

मुंबईत उपचार घेतल्यानंतर धनंजय मुंडे पुन्हा परळीत येणार असल्याचं कळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत करण्याचं बोलून दाखवलं. तेव्हा मी त्यांना हे करू नका, असं म्हटल्याचं मुंडे यांनी सांगितलं ते म्हणाले, ‘ सर्व सहकाऱ्यांना व्यासपीठावरच्या सगळ्यांना सांगितलं की हे काही करू नका. बाकीचे सगळे गप्प बसले. सगळ्यांची इच्छा होती. अपघातातून वाचलात, बरगड्यांवरच भागलंय.आम्हाला तुमचं भव्य स्वागत करायचंय..

वाल्मिक अन्ना गप्प बसले नाहीत. शांत बसलेले सगळे त्याच्या मागे होते. आजचा हा दिवस माझ्या दृष्टीनं स्वागत घेण्याचा नाही. तुमचे हार, शाल श्रीफळ घेण्याचा नाही. आजचा दिवस पुन्हा कामाला लागण्याचा आहे… असं वक्तव्य मुंडे यांनी केलंय.

वैद्यनाथाने पुनर्जन्म दिला…

परळीत बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, ‘ प्रभू परळी वैद्यनाथानं मला पुनर्जन्म दिलाय. हे सांगण्यासाठी की पुढचे 10 जन्म तुला मिळाले तरी याच मातीत जन्म घ्यायचा आणि इथलीच सेवा करायची आहे. तुला सुट्टी नाही. आज तुमच्या स्वागतात, हे प्रेम, हे आशीर्वाद होते, अशी भावना त्यांनी बोलून दाखवली.

निवडणूक जिंकल्यानंतर, मंत्री पदानंतर स्वागत समजू शकतो. त्यात अपेक्षा, स्वार्थ असतो. पण फक्त आमदार असताना अपघातातून मी वाचलोय.. मंत्री नसलो तरी फरक पडत नाही. मी तुमच्यात असावं,ही भावना तुमची दिसली. आज पाहिलं ते जगात कुठच पाहू शकत नाही.

माझ्या भाषणाच्या सुरुवातीला आपल्याच परळीतल्या तिघांचा अपघात झाला. तिन्ही तरुणांचं अंबाजोगाईच्या रुग्णालयात निधन झालं. त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. माझी या स्वागताची इच्छा नव्हती. त्या तिघांना मी श्रद्धांजली वाहतो.

एखाद्याच्या आयुष्यात किती वाईट वेळा, किती वेळेस याव्यात याला मर्यादा नव्हत्या, 2019 ला विधानसभेचा निकाल लागला. आपण विजय साजरा केला. मंत्री झालो. पहिलं लॉकडाऊन झालं. कोविडच्या काळातही एकाही कुटुंबाला राशन कमी पडणार नाही, याची जबाबदारी मी खांद्यावर घेतली. कोविडनंतर अनेक संकटांचा मला सामना करावा लागला. कार्यकर्त्यांच्या शक्तीमुळे मी सुखरूप आहे. तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलंय.