Home स्टोरी दोन निराधार वयोवृद्ध महिलांना सामाजिक बांधिलकीची मदत !

दोन निराधार वयोवृद्ध महिलांना सामाजिक बांधिलकीची मदत !

67

सावंतवाडी: ( सामाजिक कार्यकर्ते रवि जाधव ): मागील दोन वर्षापासून सावंतवाडी बाजारपेठेमध्ये एक बांद्यातील तर दुसरी माडखोल मधील अशा दोन वयोवृद्ध बेवारस महिला एकमेकांच्या संगतीने रस्त्यावर तर कधी केसरकर कॉम्प्लेक्स परिसरात पुट्टे व भंगार विकून आपलं जीवन जगवत होत्या. थंडीच्या काळामध्ये शहरांमध्ये फिरत असलेल्या इतर बेवारस व्यक्तींप्रमाणेच या दोन्हीही महिलांना सामाजिक बांधिलकी कडून नवीन चटई व ब्लॅंकेट देण्यात आले होते. तसेच कोरोनाच्या काळामध्ये सामाजिक बांधिलकीच्या टीम कडून त्यांना अधून मधून जेवणाची हि व्यवस्था केली जात असे. कोरोना ओसरल्यानंतर त्यांचे दिवसांदिवस होत चाललेले हाल पाहून त्या दोघींची रवानगी पणदूर येथील सविता आश्रम मध्ये करण्यासाठी सामाजिक बांधिलकी कडून खूप प्रयत्न झाले. परंतु सदर दोन्ही महिला आश्रम मध्ये जाण्यासाठी तयार नव्हत्या. सहा महिन्यापूर्वी त्यातील एका वयोवृद्ध महिलेच एक्सीडेंट होऊन डोक्याला ७ टाके पडले होते. त्यावेळीही सामाजिक बांधिलकीने त्यांना सहकार्य केले होते. वाढत्या वयोमानामुळे त्यांची सारखी चिडचिड होत असे व त्याचा राग ते येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर व दुकानदारांवर काढत असत. त्या नेहमीच लोकांशी हुज्जत घालून भांडत असायच्या. त्यामुळे बऱ्याच वेळा लोकांनी व दुकानदारांनी त्यांची कंप्लेंट केली होती. त्यांच्या अशा नेहमीच्या वागण्याने पोलीस कर्मचारी ही वैतागून गेले होते.

वृद्ध महिलांना आश्रमात रवाना करतांना सामाजिक कार्यकर्ते

अखेर शेवटी निर्णय घ्यावाच लागला. शहरातील एक सामाजिक कार्यकर्ता व व्यावसायिक दुर्गेश रेगे यांनी पुढाकार घेऊन थेट सविता आश्रमचे संस्थापक व प्रमुख संदीप परब यांच्याशी संपर्क करून त्यांची टीम सावंतवाडी मध्ये बोलावली. तसेच त्यांनी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, साहित्यिक व शिक्षक विठ्ठल कदम, दत्तप्रसाद फोंडेकर ,सुधीर पराडकर व पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने कायदेशीर प्रक्रिया करून त्यांची रवानगी थेट अणाव पणदूर येथील सविता आश्रम मध्ये केली. त्यामुळे उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केलंच तसेच अतिशय चांगल कार्य केलं म्हणून सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव व सामाजिक कार्यकर्ते दुर्गेश रेगे, विठ्ठल कदम, सुधीर पराडकर व दत्तप्रसाद फोंडेकर यांचे आभार मानले. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अतिशय उत्कृष्ट व प्रामाणिकपणे १५२ व्यक्ती त्यामध्ये १०० स्त्रिया व ५२ पुरुष अशा अनाथांची सेवा करणारे सविता आश्रम चे संस्थापक संदीप परब व त्यांचे कर्मचारी जानवी आंगणे, लीना पारकर, ज्योती आंगणे, केविन डिसोझा, उदय कामात व अक्सर अली यांचेही खूप आभार मानले.