Home क्राईम दोडामार्ग शहरात फ्लॅट फोडून रोख रकमेसह ऐवज लंपास…!

दोडामार्ग शहरात फ्लॅट फोडून रोख रकमेसह ऐवज लंपास…!

114

भरवस्ती मधील चोरीमुळे शहरात खळबळ.

दोडामार्ग प्रतिनिधी: दोडामार्ग शहरात भरवस्तीत बंद फ्लॅट अज्ञात चोरट्याने फोडून धाडसी चोरी केली. या चोरी प्रकरणात ६८ हजार रोख रकमेसह २० हजार रुपयांची अंगठी व महागडा मोबाईल चोरट्याने लंपास केला. थर्टी फर्स्टची धूमधाम सुरू असतानाच अज्ञात चोरट्याने हा धाडसी दरोडा घातला. याबाबत फ्लॅट मालक पुंडलिक दत्तराम गवस यांनी सोमवारी दोडामार्ग पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुंडलिक गवस हे दोडामार्ग येथील पद्मावती प्लाझा या सदनिकेत राहतात. ते रविवारी संध्याकाळी फ्लॅट बंद करून आपल्या मूळ मांगेली या गावी गेले होते. ही संधी साधून चोरट्याने रविवारी रात्री फ्लॅटचे दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. खोलीतील कपाट फोडून कपाटातील रोख ६८ हजार रुपयांची रोकड, दीड तोळ्याची अंगठी (किंमत २० हजार रुपये) व महागडा मोबाईल लंपास केला. पुंडलिक गवस हे सोमवारी सकाळी पुन्हा आपल्या फ्लॅटमध्ये आले असता त्यांना फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसले.

त्यांनी घरात प्रवेश केल्यानंतर कपाटातील रोख रक्कम, दागिने व मोबाईल चोरून नेलेला निदर्शनास आला. त्यानंतर त्यांनी दोडामार्ग पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली व चोरीची फिर्याद दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक अरुण पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश ठाकूर, पोलीस कर्मचारी विठोबा सावंत, बाबी देसाई यांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा केला. पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश ठाकूर करीत आहेत. भर वस्तीत झालेल्या या धाडसी चोरीमुळे शहरात खळबळ उडाली आहे.