Home क्राईम दोडामार्ग-बांदा मार्गाने अवैध खैरवाहतुक करणाऱ्या तीन आरोपींना कोर्टाने सुनावली दोन दिवसांची वनकोठडी.

दोडामार्ग-बांदा मार्गाने अवैध खैरवाहतुक करणाऱ्या तीन आरोपींना कोर्टाने सुनावली दोन दिवसांची वनकोठडी.

285

सावंतवाडी प्रतिनिधी: आज पहाटे दोडामार्ग-बांदा मार्गाने खैराची तोड करून अवैध वाहतूक करणाऱ्या तीन आरोपींना त्याच्या चारचाकी वाहनसह सावंतवाडी वन विभागाच्या फिरतेपथक टीमने ताब्यात घेतले. सदर आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता मा. सावंतवाडी न्यायालयाने तीन आरोपींना दोन दिवसांची वन कोठडी सुनावली.

याचा सविस्तर वृत्तांत असा की सहाय्यक वनसंरक्षक सावंतवाडी श्री. सुनिल लाड यांचे नेतृत्वाखाली सावंतवाडी फिरतेपथक वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, वनपाल मधुकर काशिद, पोलिस हवालदार गौरेश नाईक, वनरक्षक प्रमोद जगताप यांच्या गस्ती पथकाने दोडामार्ग-बांदा रस्त्यावर रात्रगस्त घालत असताना जांभळ्या रंगाची ओमनी,वाहन क्र.-GA 05 B 3524 हे वाहन संशयास्पदरित्या लाकडांच्या नगांची वाहतूक करीत असल्याचे जाणवले. त्यानुसार सदर वाहनाचा पाठलाग करून मौजे-पानवळ येथे सदरच्या वाहनाला अटकाव करण्यात आला. या वाहनाची झडती घेतली असता वाहनामध्ये खैर प्रजातीचे 8 मोठे नग, बॅटरी ऑपरेटेड दोन कटर मशीन, पाळ इत्यादी झाडतोडीचे साहित्य दिसून आले. या वाहनातून अवैध खैरवाहतूक करीत आलेल्या तीन आरोपींना, नावे- 1)गंगाराम रामा कोकरे, वय-37 वर्षे, रा.निरवडे, ता.सावंतवाडी, 2)बाबूराव भागू कोकरे, वय-50 वर्षे, रा.निरवडे, ता.सावंतवाडी, 3)अनिल विठ्ठल झोरे, वय-27 वर्षे, रा.डिगस, ता.कुडाळ अशी असून तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. त्यांच्यावर भारतीय वन अधिनियम-1927 चे कलम – 41(2)(ब), कलम-42 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

तिन्ही आरोपींना आज दुपारी सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता, गुन्हयाचे गांभीर्य पाहून आरोपींना दोन दिवसांची वन कोठडी सुनावण्यात आली. कोर्टामध्ये आरोपींची बाजू ऍडव्होकेट श्रीमती नीता गावडे यांनी मांडली तर वन विभागाच्या वतीने फिरतेपथक वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांनी प्रभाविपणे बाजू मांडली.

सदरची कारवाई ही उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री. एस.नवकिशोर रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक डॉ. सुनिल लाड यांचे मार्गदर्शनाखाली फिरतेपथक वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, वनपाल मधुकर काशिद, पोलिस हवालदार गौरेश राणे, वनरक्षक प्रमोद जगताप यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.