कल्याण प्रतिनिधी:(आनंद गायकवाड) : – कल्याण पूर्व कैलाश नगर परिसरातील एका विकासकाने खोदून ठेवलेल्या खड्डयात साठलेल्या पाण्यात बुडून मृत्यु झालेल्या १२ वर्षीय रेहान अमीन शेख या बालकाला न्याय मिळण्याची शक्यता कमी असून त्याच्या मृत्युची नोंद कोळसेवाडी पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यु म्हणून झाली असल्याने त्याच्या मृत्युला कारणीभूत ठरलेल्या संशयितां विरोधात अद्याप कोणतीही कारवाई झालेली दिसून येत नाही .आयडीएल हायस्कूल मध्ये इयत्ता ५ वीत शिक्षण घेत असलेला १२ वर्षीय रेहान अमीन शेख हा कैलाश नगर मधील रवी हॉटेलच्या समोर, राय पॅराडाईजच्या बाजुला असलेल्या आणि पाण्याने भरलेल्या खड्डात पडलेला बॉल काढत असतांना पाय घसरून पाण्यात पडला आणि त्यातच त्याचा मृत्यु झाला . सदरचा खड्डा हा एका विकासकाने खोदला असल्याचे नागरीकांत बोलले जात आहे . निष्काळजीपणे खड्डा खोदुन त्याला कसल्याही प्रकारचे संरक्षण कडे नसल्यानेच रेहानचा मृत्यु झाला हे स्पष्ट पणे दिसत असतांना कोळसेवाडी पोलिस ठाण्यात मात्र हा खड्डा खोदणाऱ्या विरोधात कसल्याही प्रकारे कारवाई न करता रेहानचा मृत्यु हा आकस्मित झाल्याची नोंद कोळसेवाडी पोलिस ठाण्यात करण्यात आल्याने या विषयी नागरीकांत आश्चर्य युक्त संताप व्यक्त करण्यात येत आहे .दरम्यान या बाबत अधिकचा तपास चालु असुन जी वस्तुस्थिती समोर येईल त्या प्रमाणे पुढील कारवाई करण्यात येईल असे कोळसेवाडी पोलिस ठाण्यातील तपासी अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले .