Home स्टोरी दिवसाची सुरुवात चांगल्या विचारांनी! जय जय रघुवीर समर्थ! श्लोक क्रमांक ९ आणि...

दिवसाची सुरुवात चांगल्या विचारांनी! जय जय रघुवीर समर्थ! श्लोक क्रमांक ९ आणि अर्थ

81

नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे!

अति स्वार्थ बुद्धी नुरे पाप साचे!

घडे भोगणे पाप ते कर्म खोटे!

न होता मनासारिखे दु:ख मोठे ||९||

अर्थ: मना, दुसऱ्याच्या धनाचा हव्यास नको. अति स्वार्थबुद्धी म्हणजे केवळ पापाची धनी असते. आणि ज्या कर्मामुळे पापाचे फळ भोगावे लागेल असे कर्म करणे खोटेपणाचे असते. आणि त्या कर्मातून मनासारखे घडले नाही तर ते खूपच मोठे दु:ख ठरते. हे मना, समोरच्याच्या द्रव्याची, संपत्तीची इच्छा, अभिलाषा धरू नये. स्वत:च्या कष्टाने आपल्या स्वत:च्या आणि आपल्या कुटुंबियांच्या निर्वाहापुरते आणि थोड्या दानधर्मापुरते द्रव्य मिळवलेले असेल त्यात तृप्ती मानावी. ‘माझे ते माझे आणि तुझे तेही माझे’ अशी स्वार्थबुद्धी ठेऊ नये. अशी स्वार्थ बुद्धी, अशी अयोग्य अभिलाषा पापकारक आहे. आणि ज्याच्यामुळे तुमच्या गाठी पापच साठेल आणि त्याचे दुष्परिणाम या जन्मात किंवा पुढच्या जन्मात केव्हा ना केव्हातरी भोगावे लागतील. असे कर्म करूच नये. पुढच्या जन्माचे तर सोडाच, या जन्मातदेखील अशा कर्मातून तुला अपेक्षित प्राप्ती झाली नाही तर त्यामुळे जी हळहळ वाटेल तिचे दु:खही फार मोठे असेल. मग अशा दु:खाला आमंत्रण द्यायचेच कशाला?