Home राजकारण दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांची उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा..

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांची उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा..

177

मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवान मान यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शुक्रवारी सायंकाळी मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. भाजपविरोधात देशपातळीवर विरोधकांची आघाडी उभारण्यावर या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे समजते. ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना करोनाशी मुकाबला करताना केलेल्या कामगिरीचे केजरीवाल यांनी कौतुक केले.केजरीवाल आणि मान हे  मुंबई दौऱ्यावर होते. त्यांचे दुपारी विमानतळावर आगमन झाल्यावर आम आदमी पक्षाच्या मुंबई अध्यक्ष प्रीती शर्मा मेनन यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. या दौऱ्यात ठाकरे यांनी त्यांना निवासस्थानी चहापानासाठी आमंत्रित केले होते. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधात देशपातळीवर विरोधकांची आघाडी उभारण्याच्या दृष्टीने ठाकरे यांनी याआधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीसह अन्य नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत.ठाकरे आणि केजरीवाल व मान यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर केजरीवाल यांनी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली करोना काळात राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांचे कौतुक केले. महाराष्ट्र व मुंबईत केलेल्या उपाययोजनांचे आम्ही बरेचदा अनुकरण केल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. निवडणुक आयोगाच्या निर्णयाने पक्षचिन्ह गेले असले तरी, राज्यातील जनता उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी आहे. ते वाघच आहेत, सर्वोच्च न्यायालयात त्यांना न्याय मिळेल असा विश्वास अरविंद केजरीवाल यांनी यावेळी व्यक्त केला.