Home स्टोरी ‘दिलीप बिल्डकॉन’ कंपनीच्या निकृष्ट कामाचा नाहक त्रास; दखल घेण्याची पावशी सरपंचांची मागणी

‘दिलीप बिल्डकॉन’ कंपनीच्या निकृष्ट कामाचा नाहक त्रास; दखल घेण्याची पावशी सरपंचांची मागणी

225

१६ जुलै, सिंधुदुर्ग वार्ता : मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावर ‘दिलीप बिल्डकॉन’ कंपनीच्या निकृष्ट कामामुळे पावशी भंगसाळ पूल व बेलनदी पुलावरून वाहनधारकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. येथील बॉक्सवेलखाली पाणी साचून विद्यार्थी व शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. निकृष्ट दर्जाच्या या कामावर रोज मलमपट्टी केली जात आहे. मात्र, कायमस्वरूपी हा प्रश्न सोडविण्यासाठी तशी उपाययोजना महामार्ग प्रशासनाने करावी, अशी मागणी होत आहे.
महामार्गावर पावशी ग्रामपंचायत हद्दीतील भंगसाळ पुलावरून जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे. तसेच बेलनदी पूलावर एका बाजूला डांबरीकरण करण्यात आले आहे. त्याठिकाणी वाहने स्लीप होऊन अपघात होण्याची दाट शक्यता आहे. पावशी बॉक्सवेलच्यावर दोन वेळा मालवाहू टेम्पो स्लीप होऊन पलटी होण्यापासून सुदैवाने वाचले. त्यावेळी ‘दिलीप बिल्डकॉन’ कंपनीने बॉक्सवेलचे काम केले होते. त्यामध्ये गेली तीन वर्षे पावसाळ्यात पाणीच पाणी साचत आहे . ते काम अर्धवट सोडून ही कंपनी निघून गेली. त्याचा नाहक त्रास पावशी गावातील शेतकरी आणि विद्यार्थ्यांना भोगावा लागतो आहे. तसेच घावनळे दशक्रोशीतील वाहतूक याच मार्गावरून सुरू असते. त्यामुळे यावर ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी पावशी सरपंच वैशाली पावसकर आणि उपसरपंच लक्ष्मीकांत तेली तसेच ग्रामस्थांनी केली आहे.
महामार्ग अधिकाऱ्यांच्या निदर्शनाला या बाबी आणून दिल्या; परंतु कार्यवाही केली जात नसल्याने वाहनधारक व ग्रामस्थांमधून संतापही व्यक्त केला जात आहे.