मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर आता आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी खासदार संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांची चौकशी करण्याची मागणी मनसेने केली आहे. तर, या प्रकरणी वरुण सरदेसाई यांची चौकशी करण्याची मागणी भाजप नेते नितेश राणे यांनी केली आहे. हे आरोपप्रत्यारोप सुरू असतानाच ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आता या प्रकरणात थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ओढलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात असून चर्चांना उधाण आलं आहे.सुषमा अंधारे यांची काल बडनेरा येथे सभा होती. या सभेत त्यांनी देशपांडे हल्ल्याचा उल्लेख करत थेट फडणवीस यांनाच या प्रकरणात ओढले. संदीप देशपांडे यांच्यावर असा हल्ला खरंच झाला असेल तर निषेधच आहे. पण कालच्या कसब्यातील पराभवाची चर्चा होत असल्याने देवेंद्रजीनी चर्चा दुसरीकडे वळवण्यासाठी तर हे केलं नाही ना, असा संशय सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला आहे. संदीप देशपांडे यांना थोडं खरचटले आहे. त्यांना काहीच होऊ नये. यावेळी लोकांनी त्यांना पळू पण दिलं नाही, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला.अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या मतदारसंघात सुषमा अंधारे यांची ही सभा होती. यावेळी त्यांनी राणा दाम्पत्यांवर जोरदार हल्ला चढवला. मला कोणी तरी सांगितलं होतं की, नवनीत अक्काला माझी गळाभेट घ्यायची आहे. त्यामुळेच मी नवनीत अक्काची गळाभेट घेण्यासाठी आले आहे. नवनीत अक्काला मला ओळखत नाहीत असं म्हणाल्या होत्या.खरं तर अक्का विसरभोळ्या झाल्या आहेत. एसीत ड्रायफ्रुट खाऊन त्यांची त्वचा चमकदार झाली आहे. त्यामुळे त्यांना आठवत नसावं बहुतेक. मला तिळगुळ पाठवणार असल्याचं नवनीत अक्का जानेवारीत म्हणाल्या होत्या. त्याची क्लिप माझ्याकडे आहे. तरीही त्या म्हणतात मी सुषमा अंधारेंना ओळखत नाही. जाऊ द्या. अक्का आपलीच आहे, असा चिमटाही अंधारे यांनी काढला.