मुंबई: – तेलगी घोटाळ्यात मी छगन भुजबळ यांचे त्यागपत्र घेतले नसते, तर त्यांना अटक झाली असती. त्यांचे त्यागपत्र घेऊन मी त्यांना अटकेपासून वाचवले, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले. महाराष्ट्रात गाजलेल्या तेलगी बनावट मुद्रांक घोटाळ्याच्या प्रकरणात तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांचे नाव आल्यावर शरद पवार यांनी भुजबळ यांना पदाचे त्यागपत्र देण्यास सांगितले होते. शरद पवार यांच्या आदेशावरूनच भुजबळ यांनी गृहमंत्रीपदाचे त्यागपत्र दिले होते.
काही दिवसांपूर्वी बीड येथील एका सार्वजनिक सभेत छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना उद्देशून ‘२३ डिसेंबर २००३ या दिवशी माझे गृहमंत्रीपदाचे त्यागपत्र तुम्ही घेतले. त्यात माझी काय चूक होती ? वर्ष १९९२-९३ आणि ९४ मध्ये खैरनार यांनी तुमच्यावरही आरोप केले होते; पण तुमचे त्यागपत्र कुणीही मागितले नाही. मग माझे त्यागपत्र का घेतले ?’, असा प्रश्न उपस्थित केला होता. याविषयी पत्रकारांनी विचारणा केली असता शरद पवार यांनी वरील वक्तव्य केले.