रत्नागिरी:– जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मुरुड येथील वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणातील संशयित आरोपी तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना आता दापोली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयाने त्यांना ३ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ‘साई रिसॉर्ट’प्रकरणी दापोली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दिघे यांनी प्रविष्ट केलेल्या फिर्यादीवरून जयराम देशपांडे यांना पोलिसांनी अटक केली.या अगोदर देशपांडे यांना अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) १४ मार्च या दिवशी अटक केली होती. रायगड जिल्हा रोजगार हमीचे अधिकारी असलेले देशपांडे यांना साई रिसॉर्ट प्रकरणावरून सेवेतून निलंबित करण्यात आले होते. साई रिसॉर्टचे सदानंद कदम यांनाही ‘ईडी’ने अटक केली आहे. माजी मंत्री अनिल परब यांचे नाव या प्रकरणाशी सातत्याने जोडले जात आहे; परंतु ‘१७ एप्रिलपर्यंत अन्वेषणयंत्रणांनी परब यांना अटक करू नये’, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.