मसुरे प्रतिनिधी: जि. प. प्राथमिक शाळा बिळवस देऊळवाडा व बिळवस नंबर १ या दोन्ही शाळांचा “बांधावरची शाळा” हा उपक्रम नुकताच बिळवस येथे संपन्न झाला. आताच्या तंत्रज्ञानाच्या युगात “पारंपारिक शेती” कोठेतरी मागे पडताना दिसते. आपला शेतकरी अर्थात बळीराजा खूप मेहनत घेऊन शेती पिकवत असतो. या शेतीमधून मिळालेल्या उत्पन्नातून तो आपले संपूर्ण कुटुंब चालवतो असतो. आर्थिक, भौगोलिक, नैसर्गिक अशा सर्व संकटांचा सामना करत हा शेतकरी राजा मोठया हिमतीने आपली शेती करत असतो. अशा या शेतीतून कष्ट करण्याच्या विद्यार्थ्यांच्या मनावरती संस्कार रुजविणाऱ्या या दोन्ही शाळांचा हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद असल्याचे मत मिळवत सरपंच मानसी पालव यांनी यावेळी बोलताना सांगितले.
आजच्या फास्ट फूडच्या जमान्यात मुलांना शेतीमधील विविध पिके, कडधान्य भाजीपाला,विविध धान्ये आणि ती पिकविण्यासाठी शेतकरी घेत असलेले कष्ट, मेहनत यांची मुलांना माहिती व्हावी, प्रत्यक्ष शेतीमधील कामाचा अनुभव मुलांना घेता यावा,शेतकरी शेतात विविध पिके घेतांना त्याला जे कष्ट पडतात ते मुलांनी समजून घ्यावेत या उदात्त हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला.
नोकरीच्या मागे आजच्या तरुण पिढीने न लागता, शेतीमध्ये विविध प्रयोग करत त्या माध्यमातून उदयोग सुरु करणे आज काळाची गरज आहे. शहराकडे न जाता खेड्याकडे, तेथील निसर्ग संपन्न शेतीकडे उद्योगाच्या आरशातून पाहात येथे आपल्या मायभूमीत आपले छोटेसे साम्राज्य निर्माण करून इतरांना सुद्धा प्रोत्साहित करावे असा या उपक्रमाचा हेतू आहे. यावेळी प्रगत शेतकरी श्री. दिनेश पालव, त्यांचे कुटुंब, शिक्षक श्री. उदय कदम, श्री. सुषण ढवण, श्री. उमेश राठोड, विद्यार्थी,शाळा कमिटी,पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.
या उपक्रमासाठी आद. केंद्र प्रमुख श्री. नंदकिशोर गोसावी सर, सरपंच सौं. मानसी पालव,शेतकरी श्री. दिनेश पालव,शाळा कमिटी अध्यक्ष सौं. सिद्धी पालव, सर्व सदस्य, पालक, व ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.