Home स्टोरी जागतिक व्यासपिठावर भारताची बाजू समर्थपणे मांडणारे प्रसिद्ध पाकिस्तानी लेखक तारेक फतेह यांचे...

जागतिक व्यासपिठावर भारताची बाजू समर्थपणे मांडणारे प्रसिद्ध पाकिस्तानी लेखक तारेक फतेह यांचे निधन

45

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: जागतिक व्यासपिठावर भारताची बाजू समर्थपणे मांडणारे, स्वतःला ‘हिंदुस्थानचे पुत्र’ संबोधणारे पाकिस्तानी मूळचे प्रसिद्ध कॅनेडियन लेखक आणि पत्रकार तारेक फतेह यांचे २४ एप्रिल या दिवशी निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. कर्करोगाने ग्रस्त असलेल्या फतेह यांच्या निधनाविषयीची माहिती त्यांची मुलगी नताशा हिने ट्वीट करून दिली. कट्टर इस्लामी धर्मांधतेच्या विरोधात ते परखडपणे विचार मांडत असत. फतेह नेहमीच स्वत:चे मूळ हे भारतीय असल्याचे अभिमानाने सांगत. अनेक मुलाखतींमध्ये त्यांनी सांगितले होते की, ते मूळचे राजपूत असून १८४० च्या दशकात त्यांच्या पूर्वजांना बळजोरीने इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले गेले.

१. फतेह यांचा जन्म पाकिस्तानातील कराचीमध्ये २० नोव्हेंबर १९४९ या दिवशी झाला. साम्यवादी विचारसरणीचे विद्यार्थी नेते म्हणून त्यांनी १९६० आणि ७० च्या दशकात कार्य केले. या काळात पाकमधील सैन्य सरकारांनी त्यांना दोनदा अटकही केली होती. वर्ष १९८७ मध्ये त्यांनी कॅनडा गाठले. तेथे ते पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत झाले.

२. इस्लामी धर्मांधतेचे टीकाकार असल्याने त्यांच्यावर अनेक वेळा धर्मांध मुसलमानांनी आक्रमण केली होती.

३. इस्लामी मूलतत्त्ववादावर त्यांनी लिहिलेली ‘चेजिंग अ मिराज : द ट्रॅजिक इल्यूजन ऑफ अ‍ॅन इस्लामिक स्टेट’ (एका मृगजळाचा पाठलाग : एका इस्लामी राज्याचा दुर्दैवी भ्रम !) आणि ‘द ज्यू इज नॉट माय एनिमी: अनव्हिलिंग द मिथ्स दॅट फ्युएल मुस्लिम अँटी सेमिटिझम्’ (ज्यू माझा शत्रू नाही : ‘मुसलमान ज्यूद्वेषा’संदर्भातील मिथकांचे अनावरण) ही पुस्तके जगप्रसिद्ध झाली.

४. अनेक वर्षांपासून ते कॅनडातील प्रसिद्ध दैनिक ‘टोरंटो सन’मध्ये स्तंभकार म्हणून कार्यरत होते. काही वर्षांपूर्वी भारतीय वृत्तवाहिनी ‘झी न्यूज’वरील ‘फतेह का फतवा’ हा त्यांचा कार्यक्रम पुष्कळ लोकप्रिय झाला होता.