Home स्टोरी जागतिक वसुंधरा दिनी कल्याण मधील रिंडरोड सभोवताली वृक्षांची लागवड

जागतिक वसुंधरा दिनी कल्याण मधील रिंडरोड सभोवताली वृक्षांची लागवड

85

कल्याण प्रतिनिधी: (आनंद गायकवाड): –जागतिक वसुंधरा दिनी कल्याण मधील रिंडरोड सभोवताली कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने वृक्षांची लागवड करण्यात येवून जागतीक वसुंधरा दिन साजरा करण्यात आला . कल्याण ते टिटवाळा हा महत्वाकांक्षी रिंगरोड प्रकल्प सध्या अंतिम टप्प्यात आला आहे. या प्रकल्पामुळे येथील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्याबरोबरच या रस्त्याची, पर्यावरण संवर्धनाचे नवे केंद्र अशी ओळख ठरणार आहे. या रिंगरोडच्या दुतर्फा पहिल्या टप्प्यात तब्बल बाराशेहून वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. आजच्या ( २२ एप्रिल ) जागतिक वसुंधरा दिनाचे (world Earth day) औचित्य साधून दुर्गाडी चौक ते गांधारीपर्यंत साडेचारशे वृक्षांची लागवड करण्यात आली असून येत्या वर्षभरात हा रस्ता हिरवाईने नटलेला पहायला मिळणार आहे. महत्वाकांक्षी रिंगरोड प्रकल्पामुळे कल्याण डोंबिवलीतील वाहतूक कोंडी कमी होणार असून वेगवेगळ्या टप्प्यात बनत असलेल्या या प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या प्रकल्पासाठी बाधित झालेल्या वृक्षसंपदेच्या बदल्यात आंबिवली येथील टेकडीवर महापालिकेमार्फत हिरवेगार निसर्ग उद्यान बनवण्यात आले आहे.

निसर्गाशी अनुरूप होण्यासह त्याला पर्यावरण संवर्धनाची नवी ओळख देण्याच्या दृष्टीने रिंगरोडच्या कल्याण ते टिटवाळा मार्गावर दुतर्फा वृक्ष लावण्यात येत असल्याची माहिती महापालिकेचे सचिव तथा मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव यांनी दिली. या रिंगरोडवर लावण्यात येणाऱ्या वृक्षांच्या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल राखण्यात येणार असल्याची माहितीही महापालिकेचे सचिव तथा मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव यांनी दिली. यामध्ये ताम्हाण, कदंब, जांभूळ, मोहगणी, बकुळ अशी वेगवेगळ्या प्रजातीची वृक्ष संपदा बहरली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वृक्ष लागवड संकल्पनेसाठी विविध सामाजिक संस्था पुढे आल्या आहेत, त्यापैकी देव इंजिनिअरिंग या कंत्राटदाराकडून पहिल्या टप्प्यात वेगवेगळ्या प्रकारची पर्यावरणाशी समतोल साधणारी बाराशे झाडं लावण्यात येणार आहेत. तसेच पुढील वर्षभर याच संस्थेमार्फत या झाडांची देखभाल आणि निगा राखली जाणार आहे. या समयी महापालिकेचे मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव, उद्यान अधीक्षक अनिल तामोरे, देव इंजिनिअरिंगचे राज पुरोहित आदी मान्यवर उपस्थित होते.