Home स्टोरी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सावंतवाडी वन विभागामध्ये दुर्मिळ वनस्पतींबाबत कार्यशाळा..!

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सावंतवाडी वन विभागामध्ये दुर्मिळ वनस्पतींबाबत कार्यशाळा..!

149

सावंतवाडी:आज जगभर साजऱ्या होत असलेल्या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सावंतवाडी वन विभागामध्ये नव्याने रुजू झालेल्या वनरक्षक तसेच सावंतवाडी व आंबोली परिक्षेत्रातील वन अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी दुर्मिळ वनस्पतींची ओळख व संवर्धन याबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदरच्या कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून कुडाळ मधील पिंगुळी येथे राहणारे वनस्पतीतज्ञ श्री.मिलिंद पाटील तसेच जिल्हा अधिक्षक भूम अभिलेख श्री.सुजितकुमार जाधवर तसेच सहाय्यक वनसंरक्षक डॉ. सुनिल लाड हे उपस्थित होते.

याचा सविस्तर वृतांत असा की, आज साजऱ्या केल्या जाणाऱ्या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सावंतवाडी वन विभागाचे उपवनसंरक्षक श्री.नवकिशोर रेड्डी व सहाय्यक वनसंरक्षक डॉ.सुनिल लाड यांच्या संकल्पनेतून वन विभागामध्ये क्षेत्रीय स्तरावर काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी, नव्याने वन विभागामध्ये रुजू झालेले वनरक्षक यांच्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हामध्ये आढळणारा, पश्चिम घाटातील दुर्मिळ, संकटग्रस्त प्रजातीतील विविध वनस्पतींची ओळख व्हावी तसेच त्यांचे संवर्धन व संरक्षण व्हावे या उद्देशाने सदरच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते. या कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून, दुर्मिळ तसेच संकटग्रस्त वृक्ष प्रजातींच्या संवर्धनासाठी काम करणारे वनस्पतीतज्ञ श्री.मिलिंद पाटील हे उपस्थित होते. या कार्यशाळेमध्ये श्री.पाटील यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी आढळणाऱ्या दुर्मिळ वनस्पती प्रजाती, त्यांना कसे ओळखावे, त्यांचे औषधी गुणधर्म, त्यांना जतन करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना तसेच रोपवटीकेच्या माध्यमातून त्यांचे संवर्धन व संरक्षण कसे करता येईल याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. वन कर्मचारी यांनी देखील प्रश्नोत्तराच्या तासात आपल्या जंगल फिरती दरम्यान दिसलेल्या दुर्मिळ वनस्पती प्रजातींच्या विषयी आपल्या शंका, प्रश्न मार्गदर्शकांना विचारून त्यांचे निरसन करून घेतले. सदरची कार्यशाळा ही आपल्या सिंधुदुर्ग मध्ये आढळत असलेल्या दुर्मिळ व संकटग्रस्त वृक्ष प्रजातींच्या संरक्षण व संवर्धनासाठी नक्कीच उपयोगी ठरेल असा विश्वास मार्गदर्शक श्री. मिलिंद पाटील यांनी व्यक्त केला. या कार्यशाळेचे नियोजन वनक्षेत्रपाल सावंतवाडी मदन क्षीरसागर, वनपाल प्रमोद राणे, वनरक्षक महादेव गेजगे व सावंतवाडी परीक्षेत्र कर्मचारी यांनी केले होते.