सावंतवाडी प्रतिनिधी: मालवणी मुलखातील लोकजीवन व लोकसंस्कृती मालवणी भाषेत शब्दबध्द करत खेड्यातील माणूस नोकरी धंदा व शिक्षणासाठी शहरात जाताना आपल्या खेडेगावातील आठवणी स्मरून किती भावूक आयुष्य जगतो त्यांचे अंतर्मुख करणारे दर्शन प्राध्यापक डॉ. नामदेव गवळी यांच्या कवितेतून होते. असे प्रतिपादन जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत यांनी केले.
जनसेवा प्रतिष्ठानचा जनसेवा मालवणी कवी पुरस्कार डाॕ. नामदेव गवळी यांना प्रदान करताना डॉ. संजीव लिंगवत बोलत होते. डॉ. नामदेव गवळी यांच्या कारीवडे येथील निवासस्थानी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संचालक तसेच बेळगांव नगरपालिका माजी विरोधी पक्षनेते पंढरी परब, सामाजिक कार्यकर्ते भानुदास पास्ते, अहमदनगर पतपेढीचे संचालक धोंडी राऊळ, किर्तनकार प्रकाश केळुसकर, निवृत्त सैनिक अनंत परब, सुप्रसिद्ध दशावतारी कलावंत मयुर गवळी, स्वंयंपुर्ण शेतकरी वसंत मोरजकर, जनसेवा प्रतिष्ठानच्या सचिव डॉ.सई लिंगवत , सौ. उषा गवळी आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. नामदेव गवळी यांनी नवी दिल्ली येथे नुकतच १९० सत्रात सहा दिवस चाललेल्या व गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेल्या विश्व बोलीभाषा संमेलनात मालवणी भाषेत कविता सादर करून मालवणी बोलीभाषा पुन्हा एकदा स्वतः समुद्रा पलीकडे नेली. त्यांच्या या योगदानाची दखल घेत जनसेवा प्रतिष्ठानतर्फे त्यांना डॉ. संजीव लिंगवत व पंढरी परब यांच्या हस्ते जनसेवा मालवणी कवी पुरस्कार प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. यावेळी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन डॉ नामदेव गवळी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संजीव लिंगवत यांनी डॉ. नामदेव गवळी यांच्या भातालय हा कवितासंग्रहातील काही निवडक मालवणी कविता सादर उपस्थित त्यांना मंत्रमुग्ध केले. यावेळी डॉ नामदेव गवळी यांनी जनसेवा प्रतिष्ठानच्या जनसेवा मालवणी कवी पुरस्कारासाठी आपले निवड केल्याबद्दल प्रतिष्ठानचे आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ. संजीव लिंगवत यांनी तर आभार मयूर गवळी यांनी मानले.
फोटो: कारीवडे – डॉ. नामदेव गवळी यांना पुरस्कार प्रदान करताना पंढरी परब डॉ. संजीव लिंगवत धोंडी राऊळ प्रकाश केळुसकर अनंत परब वसंत मोरजकर आदी