घोटाळ्याचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत असल्याचा संशय!
छत्रपती संभाजीनगर: तलाठी परीक्षेत घोटाळेबाजांची टोळी सक्रीय आहे. थेट परीक्षा केंद्रात परीक्षार्थींना उत्तरे पुरवली जात असल्याची माहिती समोर आले आहे. तलाठी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेची नक्कल (कॉपी) ३ लाख रुपयांना विकली जात आहे.
चिकलठाणे येथील इऑन परीक्षा केंद्राबाहेरून परीक्षार्थीला उत्तरे पुरवण्याच्या सिद्धतेत असलेला राजू नागरे याला पोलिसांनी ५ सप्टेंबर या दिवशी अटक केली होती. परीक्षार्थींना उत्तरे पुरवणार्या टोळीमध्ये ७ जण असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत असल्याने पोलीस त्याच दिशेने अन्वेषण करत आहेत.१. एम्.आय.डी.सी. सिडको पोलीस दुचाकी चोराच्या शोधात होते, तेव्हा परीक्षा केंद्रासमोर ४ तरुण संशयास्पद वावरतांना दिसले. पोलिसांनी त्यांना हटकले असता तिघेजण पळून गेले. राजू केवळ पोलिसांच्या हाती लागला.
२. त्याच्या खिशात मास्टरकार्ड, २ भ्रमणभाष संच सापडले. त्यातील टेलिग्रामवर ३४ प्रश्नांची छायाचित्रे होती. आरोपी राजू याने सकाळी ९ वाजता परीक्षेत एका उमेदवाराला उत्तरे पुरवल्याचे पुरावे पोलिसांना सापडले.
३. परीक्षा केंद्रातून ही यंत्रणा चालत असून एका परीक्षार्थीला उत्तरपत्रिकेची चिठ्ठी देण्यासाठी आतील कर्मचारी ३ लाख रुपये घेत असल्याचे अन्वेषणात सिद्ध झाले आहे. या टोळीची व्याप्ती मोठी आहे. अजून ६ आरोपींची नावे समोर आली आहेत.