Home क्राईम चेंबूर (मुंबई) येथील विद्यार्थ्यांच्या विषबाधेचा फॉरेन्सिक अहवाल २ मास रखडला…!

चेंबूर (मुंबई) येथील विद्यार्थ्यांच्या विषबाधेचा फॉरेन्सिक अहवाल २ मास रखडला…!

181

चेंबूर (मुंबई): चेंबूरमधील आणिकगाव येथील मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील १६ विद्यार्थ्यांना १३ ऑक्टोबर २०२३ या दिवशी माध्यान्ह भोजनातून विषबाधा झाली. या घटनेला २ मास झाल्यानंतरही माध्यान्ह भोजनाच्या नमुन्यांचा ‘फॉरेन्सिक’ अहवाल प्राप्त झालेला नाही. प्रकरण संवेदनशील असूनही शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ‘फॉरेन्सिक’ अहवाल देण्यासाठी पोलिसांना वेळ नसल्याचे कारण दिले. विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘फॉरेन्सिक अहवाल शीघ्रातीशीघ्र मागवून घेऊ’, असे आश्वासन सभागृहात दिले.

 

या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या शाळेतील १८९ विद्यार्थ्यांसाठी हे माध्यान्ह भोजन करण्यात आले होते. त्यातील ५१ विद्यार्थ्यांनी भोजन ग्रहण केले. माध्यान्ह भोजनाचा दर्जा राखला जावा, याविषयी राज्यातील २५ जिल्ह्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. अन्य जिल्ह्यांतील प्रशिक्षण येत्या शैक्षणिक वर्षापूर्वी पूर्ण होईल. ग्रामीण भागात माध्यान्ह भोजनाचा दर्जा पाहिला जातो, त्याप्रमाणे शहरी भागातील माध्यान्ह अन्नाच्या दर्जाची पडताळणी केली जाईल. शाळांमध्ये अंडे किंवा केळी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे’, असे उत्तर या तारांकित प्रश्नावर दीपक केसरकर यांनी दिले.

 

या वेळी आमदार समाधान अवताडे यांनी माध्यान्ह पुरवणारे ठेकेदार अन्न सुरक्षा मानकानुसार पात्र आहेत का ? याची पडताळणी करण्याची सूचना सभागृहात केली.