मुंबई :– येथील ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे काही भेगा पडल्याचे आढळले आहे. ‘गेट वे ऑफ इंडिया’चे संवर्धन आणि दुरुस्ती यांसाठी ८ कोटी ९८ लाख २९ सहस्र ५७४ रुपये खर्चाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय सांस्कृतिक मंत्री किशन रेड्डी यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. पुरातत्व आणि वस्तूसंग्रहालय विभागाने सविस्तर स्थळ व्यवस्थापन आराखडाही सिद्ध केल्याचे त्यांनी सांगितले.नुकत्याच केलेल्या पहाणीत ‘गेट वे ऑफ इंडिया’च्या समोरच्या भागाला तडे गेले आहेत का ?’, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, ‘‘गेट वे ऑफ इंडिया, मुंबई हे केंद्रीय यंत्रणाचे संरक्षित स्मारक नाही. ते महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय विभागाच्या संरक्षणाखाली आहे. त्याच्या पृष्ठभागावर काही भेगा आढळल्या आहेत.’’यासंदर्भात कोणताही अहवाल केंद्र सरकारला सादर करण्यात आलेला नाही. पुरातत्व आणि वस्तूसंग्रहालय संचालनालयाकडूनही सरकारकडे दुरुस्तीचा करण्याचा प्रस्ताव आलेला नाही, अशी माहितीही त्यांनी दिली.