गुजरात दंगलीतील नरोडा हत्याकांडातील सर्व आरोपींची अहमदाबादमधील विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. ११ जणांची हत्या झालेल्या या प्रकरणात गुजरातच्या माजी मंत्री माया कोडनानी आणि बाबू बजरंगी यांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणातील सर्वच ८६ आरोपींची सुटका करण्यात आली आहे. गुजरात दंगली प्रकरणातील हा अत्यंत महत्त्वाचा निकाल समजला जात आहे. २८ फेब्रुवारी २००२ रोजी अहमदाबाद शहराजवळील नरोडा येथे झालेल्या जातीय हिंसाचारात ११ लोक मारले गेले. या प्रकरणी गुजरातच्या माजी मंत्री आणि भाजप नेत्या माया कोडनानी, बजरंग दलाचे नेते बाबू बजरंगी आणि विश्व हिंदू परिषदेचे नेते जयदीप पटेल यांच्यासह ८६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी १८ जणांचा मृत्यू झाला आहे.
विशेष न्यायमूर्ती एसके बक्षी यांच्या न्यायालयाने या प्रकरणी सर्व आरोपींना न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले. सर्व आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहेत. २०१० मध्ये सुरू झालेल्या खटल्यादरम्यान, फिर्यादी आणि बचाव पक्षाने १८७ साक्षीदार आणि ५७ प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तपासले आणि सुमारे १३ वर्षे चाललेल्या या खटल्याची सलग सहा न्यायाधीशांनी सुनावणी केली.