उत्तर प्रदेश: कुख्यात गँगस्टर अतीक अहमदच्या मुलाचं आणि एका शूटरचं एन्काऊंटर कारण्यात आलं आहे. असद असं अतीकच्या मुलाचं नाव आहे. उमेश पाल खून प्रकरणात तो मुख्य आरोपी होता. याच प्रकरणात गुलाम नावाचा शूटर सह-आरोपी होता. त्याचाही एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सनं झाशीमध्ये ही कारवाई केली. या दोघांकडून परदेशी बनावटीची शस्त्रही हस्तगत करण्यात आली आहेत. या एन्काऊंटर संबंधित माहिती देताना उत्तर प्रदेश पोलीस म्हणाले की, अतिक अहमदचा मुलगा असद आणि मकसूदनाचा मुलगा गुलाम हे दोघेही उमेश पाल हत्याकांड प्रकरणात वॉन्टेड होते. झाशीचे डीएसपी नवेंदु आणि डीएसपी विमल यांच्या नेतृत्वाखालील यूपीच्या एसटीएफसोबत झालेल्या चकमकीत त्यांचा खात्मा करण्यात आला आहे. एसटीएफच्या अधिकाऱ्यांनी या दोघांना हत्यारं टाकून आत्मसमर्पण करण्यास सांगितलं, मात्र दोन्ही आरोपींनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तर म्हणून केलेल्या गोळीबारात दोघंही ठार झाले. या दोघांवरही पाच-पाच लाखांचं बक्षीस होतं.