किराडपुरा येथील जुन्या राम मंदिर परिसराला कालच्या राड्यामध्ये नुकसान झाल्याच्या अफवा उठल्या होत्या. या अफवा असून त्यात काही तथ्य नसल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. खासदार इम्तियाज जलील यांनी तर थेट त्या राम मंदिरातच धाव घेतली. मंदिराची पाहणी केली. तसेच तिथूनच लाइव्ह करत लोकांना मंदिर दाखवलं. मंदिराचं कोणतंही नुकसान झालं नसल्याचंही त्यांनी सांगितलं. मी किराडपुरातील राम मंदिरात आहे. मी स्वत: राममंदिरात आलो आहे. मी स्वत: मंदिराची पाहणी केली आहे. मंदिरात काहीच नुकसान झालं नाही. बाहेरही नुकसान नाही. कुणी काही अफवा पसरवत असेल तर अफवांवर विश्वास ठेवू नका. शांतता राखा, असं आवाहन इम्तियाज जलील यांनी केलं आहे.मी हात जोडून विनंती करतो. रमजान महिना सुरू आहे. आज राम नवमी आहे. दोन्ही सण महत्त्वाचे आहेत. हात जोडून विनंती करतो, या चांगल्या सणात खोडा घालू नका. काही लोकांमुळे सणांना गालबोट लागू देऊ नका. आपल्या घरात राहा. सण साजरा करा. शहरातील शांतता कायम राखा. तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती आहे, असं जलील म्हणाले.