Home स्टोरी कोलगाव येथील निरामय विकास केंद्र आणि गुरुजी एज्युकेशन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने...

कोलगाव येथील निरामय विकास केंद्र आणि गुरुजी एज्युकेशन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दृष्टी दोष असणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांची मोफत डोळे तपासणी.

145

सावंतवाडी प्रतिनिधी: कोलगाव येथील निरामय विकास केंद्र आणि गुरुजी एज्युकेशन फाऊंडेशन (ठाणे) यांच्या संयुक्त विद्यमाने दृष्टी दोष असणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांची मोफत डोळे तपासणी करण्यात आली. या तपासणी शिबिरात डॉक्टरांनी सांगितलेली औषधे व काही विद्यार्थ्यांना डोळ्यांचा नंबर काढून द्यावे लागणारे चष्मे याचा खर्च संस्थेतर्फे करण्यात येणार आहे.

     निरामय विकास केंद्राने जानेवारी महिन्यात सावंतवाडी तालुक्यातील सर्व प्रकारच्या दिव्यांग विद्यार्थ्यांची यादी मिळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग यांच्याकडे अर्ज केला होता. त्यानंतर सदर यादी मिळवून देण्यासाठी सावंतवाडीच्या गटशिक्षणधिकारी कल्पना बोडके यांचे सहकार्य लाभले. या यादीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची शारीरिक अक्षमता असणाऱ्या एकूण ५३८ विद्यार्थ्याचा समावेश आहे. याच यादीतील दृष्टीदोष असणाऱ्या=३० विद्यार्थ्यांच्या पालकांशी गुरुजी एज्युकेशन फाऊंडेशनच्या कार्यकर्त्या शुभांगी पवार यांनी संपर्क साधला. त्यानंतर सावंतवाडीत घेण्यात आलेल्या या शिबिरात उपस्थित राहिलेल्या १० विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी डॉ. नेहा सावंत यांच्या गवळी तिठा येथील दवाखान्यात करण्यात आली. या तपासणी नंतर पालकांना करावयाच्या उपाययोजना व घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.

   या शिबिरात इयत्ता ३ री ते १२ वी पर्यंतच्या च्या १० विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.यात ७ विद्यार्थीनी तर ३ विद्यार्थ्याचा समावेश होता. हे विद्यार्थी कोलगाव, कुणकेरी, माडखोल सांगेली, आंबोली, माजगाव व निरवडे या गावातून आले होते. या विद्यार्थ्यांना यापुढेही या आजाराबाबतअधिक मार्गदर्शन आणि आवश्यकतेनुसार आर्थिक मदत करण्यात येणार आहे.

यावेळी निरामय विकास केंद्राच्या अध्यक्षा वंदना करंबेळकर, विश्वस्त प्रसाद घाणेकर, अर्चना वझे, सुषमा राऊत, निरामय प्रायोजित सुचिता कांडरकर तसेच ठाणे येथील गुरुजी एज्युकेशन फाऊंडेशनच्या डॉ.ललिता देशपांडे उपस्थित होत्या.

कोलगाव येथील निरामय विकास केंद्राच्यावतीने यापूर्वी आरोस – दांडेली येथील माऊली कर्णबधिर निवासी विद्यालयातील ११ विद्यार्थ्यांना सुमारे ४५ हजार रुपयाची मोफत श्रवण यंत्र वितरीत करण्यात आली. तसेच थालसेमिया आजार असणाऱ्या ३ विद्यार्थ्यांना रक्त चढविण्यासाठी मार्च २०२४ पर्यंत झालेला खर्च पालकांना देण्यात आला.