Home स्टोरी कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकार सतर्क!

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकार सतर्क!

101

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकार सतर्क झाले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवार दि. २२ मार्च रोजी सायंकाळी आढावा बैठक घेतली. यावेळी कोरोना आणि एचएन 2 इन्फ्लूएंझा व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी सावध आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. या बैठकीत गृहमंत्री अमित शहा, विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, आरोग्य मंत्री मनसुख मांडविया, आरोग्य सचिव राजेश भूषण, आयसीएमआरचे राजीव बहल, नीती आयोगाचे व्ही के पॉल आणि इतर उपस्थित होते.या बैठकीत जगभरातील कोविड-19 ची परिस्थिती आणि भारतातील वाढती प्रकरणे समाविष्ट करून आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आरोग्य सचिवांनी एक व्यापक सादरीकरण केलं. या सादरीकरणात पंतप्रधानांना माहिती देण्यात आली की, २२ मार्च २०२३ रोजीपर्यंत भारतात नवीन प्रकरणांमध्ये किरकोळ वाढ झाली आहे. दररोज सरासरी ८८८ प्रकरणे आणि साप्ताहिक संसर्ग दर ०.९८ टक्के नोंदवला गेला आहे.

या आठवड्यात जागतिक स्तरावर दररोज सरासरी १.०८ लाख कोरोनाची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना विषाणूची ११३४ नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. यानंतर सक्रिय रुग्णांची संख्या ७०२६ वर पोहोचली आहे. सकाळी आठ वाजता जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, संसर्गामुळे पाच जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ५,३०,८१३ झाली आहे. मंगळवारी कोरोना विषाणू संसर्गाची ६९९ नवीन प्रकरणे समोर आली होती.