सावंतवाडी प्रतिनिधी: कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडी तर्फे जिल्हास्तरीय तुतारी कवी संमेलन मराठी भाषा दिन दिवशी २७ फेब्रुवारीला सावंतवाडी येथील मोती तलावाच्या काठी कवी केशवसुत कट्टा तुतारी जवळ सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन या दिवशी मराठी भाषा दिन साजरा केला जातो. मराठी भाषा दिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला जाणार असून, सायंकाळी ४:३० ते ५:३० या वेळेत केशवसुत कट्टा ते गांधी चौक बाजारपेठ अशी मराठी भाषा जागृती अभियान रॅली मिरवणूक काढून मराठी भाषेचे संवर्धन व जतन असा नारा दिला जाणार आहे. सावंतवाडी शहराची ख्याती, सांस्कृतिक व सांस्कृतिक वारसा जपणारी अशी आहे. त्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरात कवी केशवसुत कट्टा येथे तुतारी जवळ प्रथमच मोती तलावाच्या काठी मराठी भाषा दिन च्या निमित्ताने ‘मोती तलावाची सायंकाळ” तुतारी कवी संमेलनाने मराठी भाषा दिन साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या जिल्हास्तरीय कवी संमेलनाचे अध्यक्षस्थान जेष्ठ कवी साहित्यिक अनंत वैद्य हे भूषवणार आहेत. प्रमुख पाहुणे कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, अध्यक्ष सुभाष गोवेकर, कवी विठ्ठल कदम, कवित्री उषा परब, जिल्हा कोषाध्यक्ष भरत गावडे, ज्येष्ठ साहित्यिक इतिहासकार जी ए बुवा आधी उपस्थित राहणार आहेत. जिल्हास्तरीय तुतारी कवी संमेलन गेली कित्येक वर्षांपासून आयोजित करण्यात येते. यंदाचे यजमानपद सावंतवाडी शाखेकडे असून सावंतवाडी शाखेने हे कवी संमेलन हटके करण्याचे ठरवले आहे. कवी केशवसुत कट्ट्यावरच तुतारी जवळ सायंकाळच्या पहरी जिल्ह्यातील कवींच्या कविता रंगणार आहेत. प्रथमच तुतारी जवळच तुतारी कवी संमेलन भरत आहे. जवळपास सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ, कणकवली, मालवण, देवगड आणि वेंगुर्ले आधी भागातून कवी व कवियत्री या संमेलनात सहभागी होणार आहेत. या जिल्हास्तरीय कवी संमेलनाच्या निमित्ताने मराठी भाषा दिन असल्याने मराठी भाषेचे संवर्धन व जतन व्हावे व मराठी शाळा टिकाव्यात यासाठी कवी संमेलनाच्या अगोदर सायंकाळी ४:३० ते ५:३० यावेळेत सावंतवाडी बाजारपेठेत रामेश्वर प्लाझा मोती तलावाच्या काठाकडून विद्यार्थी व साहित्यिक कवींची मराठी भाषा जतन संवर्धन साठी भव्य रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीच्या शुभारंभ कार्यक्रमाला मुख्याधिकारी जयंत जावडेकर, तहसीलदार अरुण उंडे, पोलीस निरीक्षक फुलचंद्र मेंगडे आधी उपस्थित राहणार आहेत. जिल्हा परिषद शाळा क्रमांक २ आणि सावंतवाडी शहरातील शाळेतील विद्यार्थी या रॅलीत सहभागी होणार आहेत. या रॅलीत मराठी भाषा जनजागृती साठी मराठी भाषा संवर्धन जतन करणाऱ्या सर्व प्रेमींनी सहभागी व्हावे, तसेच ज्यांना सहभागी व्हायचे असेल त्यांनी आपली नावे विनायक गवस यांच्याकडे तर कवी संमेलनात ज्यांना कविता सादर करावयाच्या आहेत त्यांनी आपली नावे कवी विठ्ठल कदम व दीपक पटेकर ९४२१२३७५६८9 या मोबाईल नंबरवर नोंदवावीत असे आवाहन अध्यक्षॲड संतोष सावंत, सचिव प्रतिभा चव्हाण, खजिनदार डॉक्टर दीपक तुपकर आदींनी केले आहे. सावंतवाडी मराठी भाषा दिन निमित्ताने जिल्हास्तरीय तुतारी कवी संमेलन सावंतवाडीच्या मोती तलावाच्या काठी येथेच भरणार आहे.