Home स्टोरी कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेने वस्त्रहरणकार कै. गंगाराम गवाणकर यांना वाहिली...

कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेने वस्त्रहरणकार कै. गंगाराम गवाणकर यांना वाहिली श्रद्धांजली

46

सावंतवाडी: कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेने बुधवार दिनांक २८ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ६.०० वा. नगरपालिकेतील पत्रकार कक्षात वस्त्रहरणकार कै. गंगाराम गवाणकर यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. यावेळी सावंतवाडी तालुकाध्यक्ष दीपक पटेकर यांनी कै.गंगाराम गवाणकर तथा नानांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कोमसाप शाखेतर्फे श्रद्धांजली वाहिली.

वस्त्रहरणकार कै. गंगाराम गवाणकर

यावेळी नानांना श्रद्धांजली वाहताना कोमसाप सावंतवाडी सचिव राजू तावडे यांनी मालवणीसाठीचे नानांचे योगदान विसरून चालणार नाही. कोमसाप सावंतवाडीच्या संमेलनास ते अध्यक्ष म्हणून लाभले होते हे आमचे भाग्य होय. या शब्दात त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. कोमसापमुळे गंगाराम गवाणकर यांच्या सारख्या मालवणीवर प्रेम करणाऱ्या महान व्यक्तिमत्वाचा सहवास लाभला. बोलीसाठी, भाषेसाठीच त्यांच योगदान अजरामर राहील असे सदस्या मंगल नाईक जोशी म्हणाल्या. मालवणी साहित्यात गंगाराम गवाणकर यांचे योगदान फार मोठे आहे. त्यांनी लेखन केलेलं नाटक “वस्त्रहरण” अजरामर झालं. मालवणी भाषा हा त्यांचा श्वास होता. मालवणी बोलीचा त्यांचा वारसा कोमसापच्या माध्यमातून यापुढेही जपूया असे ॲड.नकुल पार्सेकर यांनी सांगितले.

वस्त्रहरणकार कै.गंगाराम गवाणकर यांचे जाणे ही साहित्य विश्वासाठी क्लेशदायक घटना आहे. नानांनी मालवणी भाषा सातासमुद्रापार नेली आणि मालवणी माणसाचं वेगळेपण त्यांनी जगाला दाखवलं. मालवणी भाषेला मानाचं स्थान मिळवून दिलं. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी आपल्या वागण्या, बोलण्यात मालवणी भाषा जपली, जतन केली तिचा प्रचार, प्रसार केला. मालवणी माणसाला मालवणी बोलीवर प्रेम करायला शिकवलं अशा भावना व्यक्त करत कोमसाप सावंतवाडी तालुकाध्यक्ष दीपक पटेकर यांनी आदरांजली अर्पण केली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार तथा तालुका उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सहसचिव विनायक गांवस आदी सदस्य उपस्थित होते.