Home क्राईम केनया येथील ५ पीडित युवतींची सुटका केल्यानंतर गोवा लैंगिक पर्यटनाचे प्रमुख ठिकाण...

केनया येथील ५ पीडित युवतींची सुटका केल्यानंतर गोवा लैंगिक पर्यटनाचे प्रमुख ठिकाण बनल्याचे उघड!

197

पणजी: हणजूण पोलिसांनी नुकतेच केनया आणि भारत यांच्यामधील आंतरराष्ट्रीय वेश्याव्यवसायाचे जाळे उघडकीस आणले आहे. या प्रकरणी पोलिसांनी केनयाच्या २ महिला मारिया डोर्कास (वय २८ वर्षे) आणि विलिस्टा आचिस्टा (वय २२ वर्षे) यांना कह्यात घेतले आहे, तर केनियातील ५ पीडित युवतींची सुटका केली आहे. या प्रकरणात सहभागी असलेला नायजेरियाचा नागरिक सध्या पसार आहे. संशयितांच्या विरोधात गुन्हे प्रविष्ट करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या कारवाईतून गोवा राज्य हे लैंगिक पर्यटनाचे एक प्रमुख ठिकाण बनल्याचे उघड झाले आहे. ७ सप्टेंबर या दिवशी केनया येथील एका पीडित युवतीने हणजूण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिला बळजोरीने वेश्याव्यवसायात लोटले जात असल्याची माहिती पोलिसांना दिली. यानुसार पोलिसांनी कारवाई केली. उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यासंबंधी माहिती देतांना म्हणाले, ‘‘पीडितांना ‘ब्युटी पार्लर’मध्ये (सौंदर्यवर्धनालयात) चांगल्या वेतनाची नोकरी देण्याचे आमीष दाखवून गोव्यात आणले जात होते. पीडितांचा प्रवास खर्च दलाल करत होते. पीडित युवतींना गोव्यात आणल्यानंतर त्यांचे पारपत्र कह्यात घेतले जात होते. त्यांना प्रथम ‘मसाज पार्लर’मध्ये काम करण्यास सक्ती करून पुढे वेश्याव्यवसायात ढकलले जात होते. हणजूण आणि शिवोली येथील २ ‘गेस्ट हाऊस’मधून वेश्याव्यवसायाचे हे जाळे चालवले जात होते. ‘गेस्ट हाऊस’च्या मालकांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांच्या या कारवाईनंतर गोवा हे लैंगिक पर्यटनाच्या आंतरराष्ट्रीय ठिकाणांमधील एक प्रमुख ठिकाण असल्याचेही उघड झाले आहे. महिलांची निरनिराळ्या देशांमधून गोव्यात तस्करी केली जाते. विशेष म्हणजे ‘मसाज रिपब्लिक’ या नावाने वेश्याव्यवसाय करणारे एक संकेतस्थळ चालू आहे; मात्र यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. आंतरराष्ट्रीय वेश्याव्यवसायाचे हे जाळे उघडकीस आणतांना कह्यात घेतलेल्या मारिया डोर्कास आणि विलिस्टा आचिस्टा या गोव्यात मागील ५ वर्षे अनधिकृतपणे वास्तव्य करून वेश्याव्यवसाय चालवत होते.

पोलिसांनी नुकतीच भाडेपट्टीवर रहाणार्यां ची नोंदणी करण्याची मोहीम राबवली होती; मात्र तरीही वेश्याव्यवसायाविषयी पोलिसांना माहिती कशी मिळाली नाही ? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. ‘वेश्याव्यवसायाच्या प्रकरणी पोलिसांचे संबंधितांशी साटेलोटे होते’, असा संशय स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.