मुंबई: कुर्ल्या येथील नेहरुनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कामगार नगरमधील शरद सोसायटीमधील एक महिला पोलीस अधिकारी त्यांच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळली आहे. प्राथमिक माहितीनुसाह हा नैसर्गिक मृत्यू असल्याची माहिती परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त हेमराज राजपूत यांनी दिली आहे. शीतल येडके असं मृत महिला पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. कुर्ल्यातील नेहरुनगर पोलीस स्टेशनमध्ये त्या पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होत्या. परंतु मागील दीड वर्षांपासून त्या कामावर नव्हत्या. एक वर्षापेक्षा अधिक काळ ड्युटीवर नसल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई देखील करण्यात आली होतं. अशी माहिती मिळत आहे.
कामगार नगरमधील शरद सोसायटीमध्ये पाचव्या मजल्यावर शीतल येडके यांचा फ्लॅट होता. मागील दोन दिवसांपासून पीएसआयच्या येडके यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. नेहरुनगर पोलिसांच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता शीतल येडके या मृतावस्थेत पडलेल्या आढळल्या. त्यांचा मृत्यू तीन ते चार दिवस आधी झाला असावा अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. ज्याअर्थी दुर्गंधी येत होती, त्यानुसार मृतदेह कुजण्यास सुरुवात झाली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टम करण्यासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला आहे. दरम्यान मृत्यूचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.