Home क्राईम कासारवाडी, माजगाव येथे ‘शंभूराजे’ नाटकातून धर्मवीर संभाजी महाराजांना अपकीर्ती करण्याचा प्रयत्न!

कासारवाडी, माजगाव येथे ‘शंभूराजे’ नाटकातून धर्मवीर संभाजी महाराजांना अपकीर्ती करण्याचा प्रयत्न!

68

सावंतवाडी प्रतिनिधी: – शहरानजीकच्या कासारवाडी, माजगाव येथे झालेल्या ‘शंभूराजे’ या नाटकातील काही प्रसंगात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना मद्यपी दाखवून त्यांची चुकीची प्रतिमा सादर करण्याचा प्रयत्न झाला. नाटक संपल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या शिवप्रेमींनी आयोजकांना ही चूक लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला असता उपस्थित असलेल्या काहींनी त्यांना धक्काबुक्की केली. अखेर हे प्रकरण पोलीस ठाण्यात जाताच झालेली, ‘चूक अनवधनाने झाल्याचे मान्य करून अशी चूक पुन्हा होणार नाही’, असे सांगून नाटकाच्या आयोजकांनी क्षमा मागितली. कासारवाडा येथील चव्हाटा मंदिर येथे नाट्यप्रयोग सादर करण्याची गेल्या काही वर्षांची परंपरा आहे. त्यानुसार २२ मार्च २०२३ या दिवशी गुढीपाडव्याच्या निमित्ताने ऐतिहासिक नाटक ‘शंभुराजे’ (लेखक ना.ध. कोचरेकर, दिग्दर्शक अतुल कारेकर, निरंजन सावंत) हे सादर करण्यात आले. या नाटकातील काही प्रसंग आणि संभाजी महाराज यांना मद्यपी दाखवून त्यांची चुकीची प्रतिमा सादर करण्यात आल्याचा आरोप करत काही शिवप्रेमींनी याला आक्षेप घेतला होता. याविषयी समजल्यानंतर आयोजक आणि नाटकातील आक्षेपार्ह प्रसंगांविषयी आक्षेप घेणारे यांना संपर्क करून हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी दोन्ही बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या वेळी नाटकातील काही प्रसंगावर आक्षेप घेतलेले अभिषेक रेगे यांनी सांगितले, नाटकातील काही प्रसंग आक्षेपार्ह आहेत, तसेच संभाजी महाराजांना मद्यपी दाखवले गेले. हे आम्हाला खटकल्याने नाटकानंतर व्यासपिठावर जाऊन आम्ही शिवप्रेमींनी अक्षेप घेत संभाजी महाराज असे नव्हते. ते असे असते, तर औरंगाजेबच्या विरोधात त्यांनी लढा दिला असता का ? आदी प्रश्न विचारले आणि संभाजी महाराजांची व्यक्तीरेखा चुकीच्या पद्धतीने मांडल्याचे लक्षात आणून दिले. त्या वेळी तेथे उपस्थित असलेल्या काहींनी आम्हाला धक्काबुक्की करून उलट आम्हालाच क्षमा मागायला लावली, असे सांगितले. त्यानंतर आम्ही सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली. तेव्हा पोलीस निरीक्षक फुलचंद्र मेंगडे यांनी विषय समजून घेतला. त्यानंतर दोन्ही गटांना बोलावून घेऊन चर्चा केली अन् आयोजकांना संभाजी महाराजांची भूमिका चुकीच्या पद्धतीने मांडल्याचे लक्षात आणून दिले. त्यानंतर त्यांनी क्षमा मागितली, असे सांगितले. याविषयी कासार समाजाचे श्री. चंद्रकांत कासार यांच्याशी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी संपर्क करून त्यांची बाजू जाणून घेतली असता कासार यांनी सांगितले की, गुढीपाडव्याला कित्येक वर्ष आमच्या वाडीत नाटक करतो. यावर्षी संभाजी महाराजांवर आधारित नाटक सादर केले. या पुस्तकाचे लेखक कोचरेकर असून हे पुस्तक वाचनालयातून एका कलानाराने आणले होते. नाटकातील सर्वच भाग पडताळून बघत नाहीत आणि बघितलाही नाही. ज्यांनी नाटकाला विरोध केला तेव्हा आमच्या लक्षात आले की, काहीतरी लिखाण चुकलेले आहे. आमचे म्हणणे होते की थेट विरोध न करता त्यांनी आम्हाला विषय समजून सांगितले असते, तर आम्ही मान्य केले असत आणि एवढा वाद झाला नसता. आम्ही पण हिंदू आहोत आणि आमच्या राजावर असे विडंबन कधीही करणार नाही; पण जे झाले ते चुकून झालेले आहे, हे आम्ही मान्य करतो. या पुढे असा प्रकार कधीही होणार नाही, तसे आम्ही पोलीस ठाण्यात लिहून पण दिलेले आहे.

पोलीस ठाण्यात कासार समाजाच्या वतीने देण्यात आलेले पत्र पोलिसांना दिलेल्या पत्रात समस्त कासारवाडा ग्रामस्थांच्या वतीने अतुल कारेकर यांनी म्हटले आहे की, कासारवाडा येथील चव्हाटा मंदिर येथे नाट्यप्रयोग सादर करण्याची गेली काही वर्षांची परंपरा आहे. त्यानुसार २२ मार्च २०२३ या दिवशी गुढीपाडव्याच्या निमित्ताने ऐतिहासिक नाटक ‘शंभुराजे’ (लेखक ना.ध. कोचरेकर, दिग्दर्शक अतुल कारेकर, निरंजन सावंत) हे सादर केले. या नाटकातील सर्व प्रसंग हे ‘शंभुराजे’ या पुस्तकाप्रमाणे सादर करण्यात आले. नाटक संपल्यानंतर आरोंदा येथील रेगे नामक व्यक्तीने एका सूत्रावर आक्षेप घेतला. त्या वेळी प्रेक्षक आणि त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर २५ मार्च या दिवशी रेगे आणि त्यांचे मित्र यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली. त्यानंतर सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद्र मेंगडे यांनी तक्रारकर्ते आणि आम्हाला पोलीस ठाण्यात बोलावून चर्चा केली. त्यानुसार नाटकात जो प्रसंग दाखवला गेला तो आमच्याकडून अनवधनाने झाला आहे. यापुढे आमच्या समाजमंडळाकडून नाटकातून कुणाच्याही भावना दुखावतील, असा प्रयोग सादर केला जाणार नाही, याची खात्री देतो.’’