जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी ‘द वायर’ला दिलेल्या मुलाखतीत अनेक गंभीर दावे केले आहेत. करण थापर यांनी घेतलेल्या या मुलाखतीमध्ये भाजपा नेते आणि गोवा तसेच जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्यासंदर्भात खळबळजनक दावा केला आहे. त्यासोबतच त्यांनी काश्मीरमधील परिस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना काहीही माहिती नाही, ते आपल्याच धुंदीत आहेत, असं म्हटलं आहे.पुलवामा हल्ल्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालय आणि सीआरपीएफ व्यवस्थापन असे दोघे जबाबदार असल्याचं सत्यपाल मलिक म्हणाले आहेत.
“सीआरपीएफनं केंद्रीय गृहमंत्रालयाकडे एअरक्राफ्टची मागणी केली होती. कारण एवढा मोठा ताफा कधीही रस्त्याने जात नाही.पण त्यांनी नकार दिला. मला जर त्यांनी विचारणा केली असती, तर मी त्यांना एअरक्राफ्ट दिलं असतं. मी त्याच संध्याकाळी पंतप्रधानांना सांगितलं की पुलवामा आपल्या चुकीमुळे घडलंय. आपण जर त्यांना एअरक्राफ्ट दिलं असतं, तर हे घडलं नसतं. तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आत्ता शांत राहा”, असं पंतप्रधान मोदींनी म्हटल्याचे सत्यपाल मलिक म्हणाले.