Home स्टोरी काजू बीच्या घटलेल्या दराबाबत बागायतदारांनी पुकारलेल्या धरणे आंदोलनास युवराज लखम सावंत भोसले...

काजू बीच्या घटलेल्या दराबाबत बागायतदारांनी पुकारलेल्या धरणे आंदोलनास युवराज लखम सावंत भोसले देणार पाठिंबा…!

124

सावंतवाडी प्रतिनिधी: काजू बीच्या घटलेल्या दराबाबत सर्व पातळीवर आवाज उठवूनही शेतकरी व बागायतदारांना कुणी वाली नाही. त्यामुळे काजु बिला किमान २०० रुपये हमीभाव मिळण्यासाठी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यातील विविध संघटनांनी सनदशीर मार्गाने शुक्रवारी १६ फेब्रुवारी रोजी प्रत्येक तालुका स्तरावर पुकारलेल्या धरणे आंदोलनास आपला सक्रिय पाठिंबा आहे. तसेच या लढ्यात स्वतः उतरून काजू उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सावंतवाडी संस्थानचे युवराज लखम सावंत भोसले यांनी सांगितले.

याबाबत युवराज लखम सावंत भोसले म्हणतात, सावंतवाडी संस्थानसह जिल्हयातील रयतेने गेल्या कित्येक पिढ्या भात, नाचणी आदी अनेक तत्सम पिके घेऊन आपली उपजीविका केली. आता नारळ, सुपारी, काजू आदी पिकाचे व्यावसायिक तत्त्वावर उत्पादन घेऊन आपली आर्थिक परिस्थिती सुधारत आहे. सध्या या उत्पादनातील ५० टक्क्याहुन अधिक टक्के काजू हे पीक रयतेचे सध्याचे उपजीविकेचे साधन बनले आहे. मात्र यातुन रयता मार्गक्रमण करीत असतानाच मागील पाच-सहा वर्षात काजू बी च्या घसरलेल्या चिंताजनक आहे. या अल्प दरामुळे रयतेचे आर्थिक बजेट कोलमडून गेले आहे. त्यामुळे न्याय नीती धर्माच्या प्रस्थापनेसाठी या अगोदरच्या लढाईत आमचे पूर्वज उतरले होते. त्याचप्रमाणे आताही या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

सध्या सुमार दर्जा असलेली काजू बी आफ्रिकेतील ब्राझील, घाणा, टांझानिया, बेनीन आदी देशांमधून अत्यल्प दराने आयात केली जात आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जा मिळालेल्या एकमेव जी आय मानांकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चविष्ट दर्जेदार व काजू बीची अवहेलना होऊ लागली आहे. पर्यायाने जिल्हयातील शेतकरी दारिद्र्याच्या खाईत लोटला आहे. लगतच्या गोवा शासनाने काजू बी ला प्रति किलो १५० रुपये हमीभाव जाहीर केला असुन आपल्या जीआय मानांकित काजू बि चा दर्जा विचारात घेऊन किमान २०० रुपये प्रति किलो दर मिळावा यासाठी सर्वसामान्य रयतेचे सनदशीर धरणे आंदोलन योग्यच असल्याचे युवराज लखम सावंत भोसले यांनी सांगितले.

काजू बीच्या कमी झालेल्या दरामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण, आरोग्य, घरगुती गरजा यावर विलक्षण परिणाम झाला आहे. अशा विदारक परिस्थितीत मराठवाडा विदर्भात आर्थिक परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपल्याकडे होत नाही. मात्र याला आपला शेतकरी समर्थपणे तोंड देत काजूच्या लागवडीसह व काजूचे उत्पादन दिवसेंदिवस वाढवीत आहोत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या कष्टाची पर्यायाने काजु बिला किमान २०० रुपये हमीभाव देण्याबाबत जिल्हयातील कुणीही दखल घेतली नाही ही शेतकऱ्यांची तक्रार रास्त आहे.

या धरणे आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी सावंतवाडी व दोडामार्ग शेतकरी व फळ बागायतदार संघ, सिंधुदुर्ग जिल्हा फळ उत्पादन संघटना, काजू समूह गोपुरी, सिंधुदुर्ग जिल्हा कृषी पदवीधर संघ, महाराष्ट्र राज्य श्रमिक शेतकरी संघटना व श्रमिक संघटना आदींनी जिल्ह्यातील सर्व शेतकरी व बागायतदारांनी विविध माध्यमांतून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संपर्क साधुन घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असुन आता शेतकरी व बागायतदारानीच हे धरणे आंदोलन यशस्वी करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे काजु बीला किमान २०० रुपये हमीभाव मिळण्यासाठी पुकारलेल्या या धरणे आंदोलनाची शासनाला दखल घ्यावीच लागणार असुन सर्व शेतकरी व बागायतदारांनी १६ फेब्रुवारीला सकाळी १०:३० वाजता आपल्या तालुक्याच्या तहसिलदार कार्यालयासमोर उपस्थित राहून या लढ्यात सहभागी व्हावे असे आवाहन करून सर्वांच्या सहकार्याने हा लढा यशस्वी होणार असल्याचा विश्वास युवराज लखम सावंत भोसले यांनी व्यक्त केला.