सिंधुदुर्ग: कांदळगाव जि प. शाळा नंबर २ चे छप्पर कोसळून वित्तहानी झाली. हे छप्पर गेल्या वर्षभरापासून नादुरुस्त होते. शाळांच्या छप्परांची दुरुस्ती जिल्हा नियोजनच्या निधी मधून केली जाते.त्यासाठी वेगळा कुठलाही निधी नसतो. ग्रामपंचायत देखील छप्पर दुरुस्तीचा खर्च करू शकत नाही. त्यामुळे कांदळगाव शाळेच्या छप्पर दुरुस्तीसाठी सातत्याने आम्ही जिल्हा नियोजनकडे आणि जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे ग्रामपंचायत स्तरावरून पाठपुरावा करत होतो. आमदार वैभव नाईक यांनी देखील निधी मिळण्यासाठी पाठपुरावा केला होता. तरी देखील जिल्ह्याच्या सत्ताधाऱ्यांकडून कांदळगाव शाळेच्या छप्पर दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्यात आला नाही.मात्र जिल्हा नियोजनचे पैसे अनावश्यक ठिकाणी खर्च करण्यात आले. शाळा दुरुस्ती ऐवजी पंतप्रधान मोदीजींच्या दौऱ्याला त्याचबरोबर शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी कोट्यावधींचा खर्च करण्यात आला. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे लक्ष नसल्याने निधी अभावी नादुरुस्त असलेले छप्पर कोसळले. त्याला सर्वस्वी सत्ताधारी भाजप जबाबदार आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे. मात्र सत्ताधारी भाजपचा बेजबाबदारपणा झाकण्यासाठी दोन दिवसांपूर्वी माजी खा. निलेश राणे यांनी शाळेच्या कोसळलेल्या छप्पराची पाहणी केली.परंतु यावर दुर्लक्ष करणाऱ्या पालकमंत्र्यांना जाब विचारण्याची हिम्मत निलेश राणे दाखवतील का? असा सवाल कांदळगाव सरपंच रणजित परब यांनी केला आहे.