Home राजकारण काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व शुक्रवारी संपुष्टात!

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व शुक्रवारी संपुष्टात!

161

‘सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे?’ या कथित टिप्पणीसाठी सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी लोकसभा सचिवालयाने तत्परतेने हालचाली करून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची अधिसूचना काढली. त्यामुळे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व शुक्रवारी संपुष्टात आले. या निर्णयाने देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. सर्व विरोधी पक्षांनी एकजूट दाखवत या निर्णयाचा जोरदार विरोध सुरू केला आहे. लोकशाही धोक्यात असल्याचा आरोप करत आणि अदानी प्रकरणाच्या जेपीसी चौकशीची मागणी करत संसद भवनापासून निषेध मोर्चा काढणाऱ्या काँग्रेसच्या खासदारांसह ३० विरोधी खासदारांना काल शुक्रवार दि. २४ मार्च रोजी ताब्यात घेण्यात आले. के. सी. वेणुगोपाल, अधीर रंजन चौधरी, के. सुरेश, मणिकम टागोर, इम्रान प्रतापगढी आणि मोहम्मद जावेद यांच्यासह प्रमुख नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. असा दावा विरोधकांनी केला आहे. कलम १४४ चे उल्लंघन केल्याबद्दल विरोधी पक्षांच्या ३० हून अधिक खासदारांना ताब्यात घ्यावे लागले. अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. ताब्यात घेतलेल्यांना जवळच्या पोलिस ठाण्यात नेण्यात आले.