सावंतवाडी प्रतिनिधी: सोशल मिडियावर झळकण्यासाठी मोती तलावाच्या मध्यभागी असणाऱ्या कविवर्य केशवसुत यांच्या ‘तुतारी’ स्मारकाच्या ठिकाणी अवमानकारक वर्तन करून एका अज्ञात व्यक्तीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यातून कविवर्य केशवसुतांच्या स्मारकाचा अवमान करण्यात आला आहे. याची गंभीर दखल कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेने घेतली आहे. कोमसाप सावंतवाडी शाखेच्या वतीने तीव्र निषेध करत संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करावी व भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत याची दक्षता घ्यावी. अशी मागणी आज शुक्रवार दि.३ मार्च २०२३ तात्काळ सावंतवाडीचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर व सावंतवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष ॲड. संतोष सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने केली आहे. यावेळी जिल्हा कोषाध्यक्ष भरत गावडे, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सहसचिव राजू तावडे, ॲड नकुल पारसेकर, दीपक पटेकर, रुपेश पाटील, विनायक गवस, श्री कुडतरकर आधी उपस्थित होते. यावेळी सदरचा सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहता ही घटना अत्यंत गंभीर आहे.
निश्चितपणे सावंतवाडी नगरपालिकेच्या वतीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली जाईल असे आश्वासन मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी दिले. तर पोलीस निरीक्षक मेंगडे यांनी या घटनेची सायबर क्राईम द्वारे सखोल चौकशी करून संबंधिताला गजाआड केले जाईल. असे आश्वासन दिले. यावेळी शाखेचे अध्यक्ष ॲड सावंत यांनी सदर व्यक्ती ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच असावी कारण सदर व्यक्तीने जाणीवपूर्वक हे कृत्य केले आहे. कारण सोशल मीडियावर व्हिडिओ आपल्या मित्रांकडे व्हायरल करून आपल्या कृत्याचे त्यांनी समर्थनच केले आहे. त्यामुळे साहित्यिकांची अशी अवहेलना कोकण मराठी साहित्य परिषद आणि साहित्य प्रेमी कधीही खपवून घेणार नाहीत. या घटनेने सुसंस्कृत साहित्यिक सामाजिक वारसा असलेल्या सावंतवाडीकरानी या घटनेची तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे सदर व्यक्ती चा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करावी व त्या व्यक्तीने सोशल मीडियावरच आपली जाहीर दिलगिरी व्यक्त करावी. असे स्पष्ट केले.कविवर्य केशवसुत उर्फ कृष्णाजी केशव दामले यांचं सावंतवाडी शहरात माठेवाडा येथे वास्तव्य होतं. यावेळी मोती तलाव काठावर संध्याकाळी कवितेंचे लेखन त्यांनी केलं होतं. त्यांच्या स्मरणार्थ मोती तलावाच्या मध्यभागी असणाऱ्या केशवसुत कट्ट्यावर त्यांच्या काही अजरामर कविता पहायला मिळतात. त्यांच्या तुतारी कवितेचं प्रतिक असणारं तुतारी स्मारक या ठिकाणी उभारण्यात आले आहे. दरम्यान, गेले दोन दिवस एका अज्ञात व्यक्तीचा स्मारकाच्या ठिकाणी असणारी तुतारी फुंकतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तो व्यक्ती स्मारकावर उभा राहून तुतारी फुंकण्याचा अभिनय करत आहे. हा व्हिडिओ एडिट करून त्याला तुतारीचा आवाज लावून सोशल मिडियावर टाकला गेला. ट्रेडिंगच्या नावाखाली स्मारकाचा अवमान त्या व्यक्तीकडून केला गेला आहे. या घटनेचा कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडीच्यावतीन तीव्र निषेध करत संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करावी व भविष्यात अशा घटना होऊ नयेत याची दक्षता घ्यावी. अशी मागणी कोमसाप शाखा सावंतवाडीच्यावतीनं पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे, न.प.मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.ही घटना निषेधार्ह आहे. याबाबत पोलिसांना न.प. तर्फे कारवाईची विनंती करणार असून स्मारकाच्या ठिकाणी यापुढे अशा घटना घडू नये यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून सुचना फलक लावण्यात येणार असल्याचं मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी सांगितले. तर पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी या घटनेची गंभीर दखल घेत संबंधित व्यक्ती व व्हिडिओ चित्रीकरण करणाऱ्यांचा सायबर क्राईमच्या माध्यमातून शोध घेऊन कारवाई करणार. व्हायरल व्हिडिओ व कोमसापनं केलेली मागणी सायबर क्राईमच्या अधिकाऱ्यांकडे वर्ग करत संबंधितांवर कडक कारवाई करणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिले. दरम्यान, सोशल मिडिया ट्रेडिंगच्या नावाखाली अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत. तुतारीला बाधा निर्माण होईल असं कृत्य कुणाकडून घडू नये. यासाठी दक्षता घ्यावी.असं आवाहन कोमसाप सावंतवाडी शाखेच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. यावेळी अभिमन्यू लोंढे, नकुल पारसेकर, राजू तावडे, रुपेश पाटील, भरत गावडे, विनायक गवस यांनीही सदर घटना ही साहित्यिकांचा आव्हान करणारी आहे. त्यामुळे पोलिसांनी व पालिका प्रशासन यांनी याकडे गांभीर्याने पाहावे असे सुचित केले