Home स्टोरी कल्याण पूर्वेतील समता फेरीत आंबेडकरवादी विविध संस्था संघटनांसह अनेक हिंदूत्ववादी मान्यवरांचाही उत्फुर्त...

कल्याण पूर्वेतील समता फेरीत आंबेडकरवादी विविध संस्था संघटनांसह अनेक हिंदूत्ववादी मान्यवरांचाही उत्फुर्त सहभाग.

67

कल्याण प्रतिनिधी: (आनंद गायकवाड): – भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३८ व्या जयंती दिनी म्हणजेच १४ एप्रिल रोजी सायंकाळी कल्याण पूर्वेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य समता फेरी काढण्यात आली होती, या समता फेरीने अन्य कल्याण पूर्वेतीत या अगोदरच्या सर्व मिरवणुकांच्या गर्दीचा उच्चांग मोडीत समतेचा संदेश दिला. या समता फेरीत कल्याण पूर्व परिसरातील विविध आंबेडकरवादी संस्था संघटना सह अनेक हिंदूत्ववादी संस्था – संघटना राजकीय पक्षांचे प्रतिनिधीं आणि पदाधिकारी मोठा संख्येने सहभागी झाले होते.

विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती कल्याण पूर्वच्या वतीने काढण्यात आलेल्या या यात्रेचा प्रारंभ तिसाई देवी उड्डाण पूला जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून बुध्द वंदनेने करण्यात आला. ही समता फेरी चक्की नाका, मातोश्री गुंजाई चौक, तिसगांव नाका, म्हसोबा चौक, माता रमाई चौक , सिद्धार्थ नगर, गणेश मंदीर मार्गे मुख्य बाजार पेठ रस्त्याने काटेमानिवली चौकातून प्रभाग ड कार्यालयाच्या प्रांगणात आल्यानंतर या ठिकाणी या समता फेरीची सांगता करण्यात आली. या समता फेरीत आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या आजी माजी पदाधिकार्‍यांसह हिंदू नव वर्ष स्वागत यात्रेचे अध्यक्ष आणि आमदार गणपत गायकवाड, हिंदूत्ववादी शिवसेनेचे कल्याण पूर्व शहर अध्यक्ष महेश गायकवाड, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उप जिल्हा प्रमुख हर्षवर्धन पालांडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समर्थक नरेंद्र सुर्यवंशी, संदिप तांबे, जरी मरी सेवा मंडळाचे अध्यक्ष दत्ता गायकवाड, स्वामी विवेकानंद प्रेरणा यात्रेचे माजी अध्यक्ष आणि माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड, माजी नगरसेवक आणि हिंदू नव वर्ष स्वागत यात्रेचे सदस्य मनोज राय, सार्वजनिक शिव जयंती उत्सव समितीचे विद्यमान अध्यक्ष राजू अंकुश आदी विविध जाती पंथाचे मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या समता फेरीत सोनेरी अश्वरथामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्ध पुतळा विराजमान करण्यात आला होता. तर डॉ. सुनिल भालेराव यांच्या संकल्पनेतून ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन का केले? या विषयावर आधारी साकारण्यात आलेला चित्र रथ सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. समता फेरीच्या शेवटचा टोकावर डी जे वर लावण्यात आलेल्या उडत्या चालीवरील भिम गितांवर तरुणाई मोठ्या उत्साहात थिरकत वातावरणात जोष आणि उत्साह निर्माण करत असतांनाच डॉ. बाबासाहेब आबेडकर यांच्या नावाचा जयघोष करीत आंबेडकरांप्रती आपल्या प्रेम भावना व्यक्त करीत होती.

समता फेरीच्या सुरुवाती पासून शेवट पर्यंत महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय दिसून आली. शिवसेना उपजिल्हा प्रमुख मल्लेश शेट्टी यांनी आपल्या कार्यालया समोर, आर. पी. आय चें धर्मा वक्ते यांनी नेतिवली चौकात, भाजपाचे कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे यांनी चक्कीनाका येथे, शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी गुंजाई चौकात, शिवसेना उपशहर संघटक भारती जाधव तसेच आपला मैदान या संस्थेने संतोष नगर येथे, दादासाहेब महाले यांनी हॉटेल प्रसाद समोर तर आमदार गणपत गायकवाड यांनी तिसगांव नाक्यावर शिवसेनेचे समता फेरीचे यथोचित स्वागत केले. तिसगाव वाक्यावर उभारण्यात आलेल्या मंचकावर समता फेरीतील सहभागी मान्यवरांचा आमदार गणपत गायकवाड यांचे हस्ते सन्मान चिन्ह देवून सन्मान करण्यात आला. कल्याण पूर्वेतील तमाम आंबेडकरवादी समाज बांधवांच्या आस्मितेचे प्रतिक म्हणून ओळख निर्माण करणारे प्रभाग ड कार्यालया समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम सुरु असल्याच्या पार्श्वभूमिवर आंबेडकरी समाजात या वर्षी आंबेडकर जयंती दिनी प्रती वर्षाच्या तुलनेत आनंद द्विगुणीत झाल्याने या समता फेरीत हजोरो भिमसैनिकांचा जनसागर लोटल्याने तिसगांव नाक्याहून ही समता फेरी पुढे सिद्धार्थ नगर कडे जात असतांना या फेरीच्या मार्गातील सर्व रस्ते वाहतूकीसाठी ठप्प झाल्याचे दिसून आले.

समता फेरीच्या समारोप समयी या वर्षीच्या अध्यक्षा आयु. सिंधुताई मेश्राम यांनी समता फेरी यशस्वी करणाऱ्या सर्व संबंधीतांचे जाहीर आभार मानले.