Home स्टोरी कल्याण पूर्वेतील विध्नहर्ता गृह संकुलातील अनधिकृत बांधकामा विरोधात तक्रारदाराचे उपोषण !

कल्याण पूर्वेतील विध्नहर्ता गृह संकुलातील अनधिकृत बांधकामा विरोधात तक्रारदाराचे उपोषण !

227

कल्याण प्रतिनिधी: (आनंद गायकवाड):- कल्याण पूर्वेतील प्रभाग ९ आय अंतर्गत असलेल्या विध्नहर्ता गृह संकुलाच्या वाहन तळावर सोसायटीतील काही सदस्यांनी अनधिकृत बांधकाम करून वाहन तळातर अतिक्रमण केले आहे. या बाबतची तक्रार याच सोसायटीत रहाणारे अशोक गायकवाड यांनी प्रभाग ९ आय कार्यालयात केली होती. परंतु या तक्रारी कडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत आपणांस न्याय मिळावा या साठी त्यांनी आपल्या कुटुंबासह कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालया समोरील पदपथावर आपल्या कुटुंबीयांसह उपोषणाला सुरुवात केली होती. या उपोषणाची दखल घेत उपायुक्त सुधाकर जगताप यांनी प्रभाग ९ आयच्या सहाय्यक आयुक्त सौ. हेमा मुंबरकर यांना येत्या एक महिन्याचे आत या प्रकरणी सुनावणी घेवून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने सुरु करण्यात आलेले उपोषण स्थगित करण्यात आल्याचे गायकवाड कुटुंबियांकडून सांगण्यात आले. प्राप्त माहिती नुसार विध्नहर्ता सोसायटीने एका ठरावा द्वारे सोसायटीच्या सदस्यांसाठी एक धार्मिक स्थळ निर्माण करण्याचे नियोजन केले होते. परंतु सदर ठरावात हे धार्मिक स्थळ कोणत्या ठिकाणी निर्माण करायचे हे ठरविण्यात आले नव्हते या ठरावात तक्रारदाराचीही स्वाक्षरी आहे. परंतु धार्मिक स्थळ हे तक्रारदाराच्या सदनिकेलाच खेटून आणि वाहन तळाच्या जागेवर अतिक्रमण करून निर्माण करण्यात आले. या मुळे तक्रारदाराला भविष्यात अनेक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे असे तक्रारदाराने आपल्या तक्रार अर्जात नमुद केले होते. तक्रार अर्ज प्राप्त होताच सहाय्यक आयुक्त सौ हेमा मुंबरकर यांनी संबंधीतांना नोटीस पाठवून काम थांबविण्यास सांगितले होते तसेच बांधकामाच्या वैद्यते बाबत पुरावे सादर करण्यासही सांगितले होते. तरीसुद्धा सदरचे बांधकाम पुर्ण करण्यात येवून त्याचा वापरही सुरु करण्यात आला आहे.

या प्रकाराला व्यथीत होवून न्याय हक्कासाठी तक्रारदार अशोक गायकवाड यांनी सोमवार पासुन आपल्या कुटूंबियांसह उपोषण सुरु केले होते. त्यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी रिपब्लीन पार्टी ऑफ इंडियाचे शहर अध्यक्ष संजय जाधव, विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष देवचंद अंबादे, माजी अध्यक्ष अशोक भोसले, अभिवादन समितीचे मिलिंद सकपाळ यांचे सह अनेक आंबेडकर वादी मंडळींनी उपोषण स्थळी धाव घेवून अशोक गायकवाड यांच्या उपोषणाला जाहिर पाठींबा दिला. या उपोषणाची अनधिकृत बाधकाम नियंत्रण विभागाचे उपायुक्त सुधाकर जगताप यांनी दखल घेवून उपोषण कर्ते आणि प्रभाग ९ आय च्या सहाय्यक आयुक्त सौ हेमा मुंबरकर यांचे बरोबर समोरासमोर चर्चा करून येत्या महिन्याभरात संबंधीत अनधिकृत बाधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिल्या नंतर या उपोषणाची सांगता करण्यात आली. एका महिन्याचे आत अनधिकृत बांधकामावर कारवाई न झाल्यास पुन्हा उपोषणाला बसणार असल्याचा इशारा अशोक गायकवाड यांनी दिला आहे.