Home स्टोरी कलंबिस्त इंग्लिश स्कूल, कलंबिस्त १० वी बॅच १९९३-९४ चा स्नेहसंमेलन सोहळा अविस्मरणीय...

कलंबिस्त इंग्लिश स्कूल, कलंबिस्त १० वी बॅच १९९३-९४ चा स्नेहसंमेलन सोहळा अविस्मरणीय ठरला.

105

विविध कार्यक्रम, मनोगतं व बालपणीच्या आठवणींना दिला उजाळा.

सावंतवाडी प्रतिनिधी: कलंबिस्त इंग्लिश स्कूल, कलंबिस्तमधील दहावी १९९३-९४ बॅचच्या माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा रविवारी दि. १४ मे २०२३ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याला उपस्थित माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी सादर केलेले विविध गुणदर्शन कार्यक्रम मनोगते यांमुळे स्नेह मेळाव्याला बहार आली. धमाल मस्ती व मनोरंजनाच्या कार्यक्रमांसह जुन्या आठवणींना उजाळा देत हा स्नेह मेळावा अविस्मरणीय ठरला. शिरोडा वेळागर येथील प्रख्यात डॉफिन रिसॉर्ट या अत्यंत रमणीय व निसर्गरम्य असलेल्या या रिसॉर्टवर संपन्न झालेल्या या मेळाव्यात ग्रुपमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतांमधून आपली ओळख करून देतानाच वर्गातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच सद्यस्थितीत सर्वजण कोणकोणत्या क्षेत्रात कार्यरत आहेत याचाही आढावा घेतला.सर्वांनीच आपलं वाढतं वय विसरून सहकारी मित्रांसोबत धमाल केली. आपापल्या आयुष्यातील व करिअरमधील चढ-उतार यांचे अनुभव कथन करीत सर्वांचीच मने मोकळी झाली व पुढील आयुष्यासाठी नवी चेतना प्राप्त झाल्याचा भास झाला. दहावी नंतर आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी व्यवसायांनिमित्त एकमेकांपासून दूर गेलेले हे विद्यार्थी व विद्यार्थिनी तब्बल ३ दशकानंतर या स्नेह मेळाव्यात सर्व एकत्र आले होते, मैत्री सोहळा साजरा करण्यासाठी. कलंबिस्त सहित वेर्ले, सावरवाड, शिरशिंगे या गावांमधील माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सहभाग असलेला हा स्नेहसोहळा उत्तम नियोजनात दिमाखात पार पडला.

या कार्यक्रमाचे नियोजन श्री. दिपक राऊळ, सतिश सावंत, सुषमा सावंत व संजय पालकर यांनी केले. यात दिपक राऊळ, दिपाली नाईक, विष्णू राऊळ, रामा राऊळ, सुषमा सावंत, सतिश सावंत, प्रविण कुडतरकर, ज्युली फर्नांडिस, महेश मडगांवकर, केशव पवार, अनिल राऊळ, अनिल देसाई, कलेशा म्हाडगुत, रामा राऊळ, सुरत पवार, कल्पना पास्ते, रजनी राणे, रेश्मा पवार, सुनिल राऊळ, संजय पालकर, राजेश गोवेकर, गोपाळ बांदेकर, संतोष राऊळ, सुनिल राऊळ, जयेंद्र राऊळ, महेश राऊळ, दिनेश देसाई, सुभाष कुडतरकर, आदी माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होते. यावेळी दिवंगतांना श्रध्दांजली देऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. संजय पालकर व सुषमा सावंत ह्यांनी केले. त्यानंतर उपस्थितांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. परीचय व मनोगतासोबत केक कापून सेलिब्रेशन करण्यात आले. त्यानंतर सर्वांना आठवणरूपी भेट मोमेंटो दिले.

गेट-टुगेदर का केलं पाहिजे? तसेच आपल्या आयुष्यात मित्रांची गरज का आहे ? मुलांचे शिक्षण तसेच संसार सांभाळताना माणूस स्वतःसाठी जगणे विसरून जातो. अशा गेट- टुगेदरच्या माध्यमातून निदान एक दिवस तरी स्वत:साठी जगावं. गेल्या २९-३० वर्षांच्या कालावधीत काय कमावलं आणि काय गमावलं याचा विचार करण्यापेक्षा एका नवीन आयुष्याची सुरुवात आपण यापुढील काळात करूया आणि आपले पुढील आयुष्य कसे सुखमय व आनंदमय करता येईल, यासाठी प्रयत्न करू. गेट-टुगेदररूपी औषध आपण वर्षातून एकदा तरी घेऊया आणि आपल्या मैत्रीचे नाते मैत्रीच्या धाग्यांनी पुन्हा एकदा घट्ट बांधूया. जेणेकरून पुढील येणाऱ्या काळात कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्यास आपण सर्वजण तयार राहू, असे विचार आपल्या मनोगतात श्री. दिपक राऊळ यांनी मांडले. उपस्थितांचे आभार श्री. विष्णू राऊळ यांनी मानले. जुन्या आठवणींना उजाळा देत सहभोजन व त्यानंतर शिरोडा वेळागरच्या रुपेरी किनाऱ्यावरील चंदेरी वाळूत विविध खेळ खेळत समुद्रकिनारी सफरीचा व स्नानाचा आनंद देखील घेतला. पुढील वर्षी परत भेटण्याचा संकल्प करीत दिवसभराच्या आठवणी मनात साठवत सर्वांनी तात्पुरता निरोप घेतला.