लोकन्यायालयामध्ये २०५० प्रकरणे. तडजोडीने मिटली ३ कोटी ४२ लाख ६६ हजार रक्कम…!
सिंधुदुर्ग: जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या लोक अदालतीमध्ये पक्षकारांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. प्रलंबित असलेली २०५० प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली आहेत. अशा लोक अदालतीमुळे झटपट न्याय व पक्षकारांमधील आपापसातील मतभेद तडजोडीने मिटत असल्यामुळे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होण्यास मदत झाली आहे. या लोक अदालतीमध्ये ३,४२,६६,००१/- वसुली होऊन ही प्रकरणे मिटली आहेत.
दिनांक ०३ मार्च २०२४ रोजी मा. श्री. एच. बी. गायकवाड, प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालये तसेच जिल्हा व सत्र न्यायालय, सिंधुदुर्ग यांनी राष्ट्रीय लोक अदालतीसाठी पॅनेल नेमण्यात आले होते. सदर पॅनेल समोर दिवाणी दावे, तडजोडपात्र स्वरुपाची फौजदारी प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, धनादेशाबाबतची प्रकरणे, कर्ज वसुली प्रकरणे व सर्व प्रकारची वादपुर्व प्रकरणे तडजोड होऊन निकाली झाली आहेत. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये पक्षकार व विधीज्ञ यांनी उत्साहाने सहभाग घेतला. सदर राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी होण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालय, सिंधुदुर्ग तसेच सर्व तालुका न्यायालये येथील सर्व न्यायिक अधिकारी व कर्मचारी यांनी सुमारे दोन महिन्यांपासून परिश्रम घेतले होते. तसेच पोलिस अधिकारी व कर्मचारी व अन्य शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी देखील महत्त्वपूर्ण सहभाग घेतला होता. सदर राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जिल्ह्यात एकुण २०५० प्रकरणे तडजोडीने निकाली झाली. सदर प्रकरणातील एकूण तडजोडीची रक्कम रुपये ३,४२,६६,००१/- अशी आहे. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तडजोड झालेल्या प्रकरणांमध्ये समजोता करार होऊन निकाल झाल्याने त्यांचेतील सामंजस्य व जिव्हाळा टिकून राहिला आहे. तसेच सदर तडजोडीच्या निकालांविरुध्द अपील होत नसल्याने त्यांच्या वेळची व पैशाची बचत झाली आहे.