Home स्टोरी ओरोस येथील ‘तोंड बंद’ आंदोलनाला लोकशाहीप्रेमींचा उत्तम प्रतिसाद

ओरोस येथील ‘तोंड बंद’ आंदोलनाला लोकशाहीप्रेमींचा उत्तम प्रतिसाद

93

सावंतवाडी वार्ताहर: सिंधुदुर्गनगरी, दि. १७: राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या निर्घृण खुनाचा निषेध नोंदविण्यासाठी आणि समाजाच्या संवेदना जागृत करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सजग नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या ‘आम्ही सारे भारतीय’ या मंचाच्यावतीने सिंधुदुर्गनगरी ओरोस फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आज झालेल्या ‘तोंड बंद आंदोलना’ला लोकशाहीप्रेमींचा उत्तम प्रतिसाद मिळाला. भाषणबाजीला पूर्णपणे फाटा देऊन झालेल्या या आंदोलनात सुमारे शंभरहून अधिक नागरिकांनी सकाळी १०-३० ते दुपारी एकपर्यंत तोंडावर काळी पट्टी बांधून मौन धारण केले व आंदोलनाचा वेळ वाचनात व्यतीत केला.

पत्रकार शशिकांत वारिशे

या आंदोलनाचे नियोजन ॲड. संदीप निंबाळकर, ‘बॅ. नाथ पै सेवांगण’चे देवदत्त परुळेकर, ‘घुंगुरकाठी’चे सतीश लळीत, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश जैतापकर, विनायक उर्फ बाळू मेस्त्री, पुरुषोत्तम लाडु कदम आदींनी केले होते. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ आणि सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय पत्रकार संघ यांनी या अभिनव आंदोलनाला पाठिंबा दिला होता. सकाळी साडेदहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करण्यात आले. त्यानंतर घटनेच्या ‘आम्ही भारताचे लोक…’ या प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले. यानंतर सर्व आंदोलकांनी तोंडावर काळ्या पट्ट्या बांधुन दुपारी एक वाजेपर्यंत मौन धारण केले. आंदोलनाचा काळ वाचनात व्यतीत करण्यात आला.आंदोलनस्थळी असलेल्या ‘आम्ही सारे भारतीय’ या बॅनरवर महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची छायाचित्रे होती. तसेच, आंदोलनाचा हेतू स्पष्ट करणारा फलक लावण्यात आला होता. आंदोलन गांभिर्यपूर्ण वातावरणात झाले. सर्वात शेवटी कै. वारिशे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली व राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष गजानन नाईक, मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय वालावलकर व अन्य पत्रकारांनी सहभाग घेतला.राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरीच्या विरोधातील बातम्या सातत्याने प्रसिद्ध केल्यामुळे आणि एक विशिष्ट भूमिका घेतल्यामुळे मूळ कशेळी येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना जीवे मारण्यात आले. अतिशय अमानुषपणे एका निर्भीड पत्रकाराला क्रूरपणे संपविण्यात आले. मात्र या अघोरी कृत्याबाबत समाजातून आवश्यक त्या प्रमाणात निषेधाचा सूर उमटला नाही. काही पत्रकार संघटना, राजकीय पक्ष यांनी या खुनाबद्दल निषेध नोंदवून आंदोलने केली. परंतु दिवसाढवळ्या एका पत्रकाराचा खून होतो आणि त्याची अपेक्षित तीव्र प्रतिक्रिया समाजात उमटली नाही. यामुळे समाज आपल्या संवेदना हरपत चालला आहे की काय, अशी शंका यावी, असे चित्र निर्माण झाले आहे. हे लक्षात घेऊन अशा हिंसक आणि लोकशाहीविरोधी, घटनेच्या तत्वांची पायमल्ली करणाऱ्या घटनांबाबत समाजाने एक निश्चित भूमिका घेऊन उभे राहिले पाहिजे, हे मांडण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला. यात डॉ. विजयालक्ष्मी चिंडक, सौ. मंगला परुळेकर, डॉ. सई लळीत, प्रा. डॉ. श्रीकांत सावंत, पत्रकार विजय शेट्टी, इर्शाद शेख, द्वारकानाथ घुर्ये, नंदन वेंगुर्लेकर, नामानंद मोडक, ॲड. मनोज रावराणे, नागेश मोर्ये, महेश परुळेकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, रमेश बोंद्रे, अंकुश जाधव, मोहन जाधव, बळीराम कदम, महेश देसाई, दयानंद चौधरी, भगवान शेलटे, शफिक आदमसाब खान, शशिकांत कासले, प्रदीप मांजरेकर, रौनकअली पटेल, संजय वराडकर यांचा सहभाग होता.जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष गणेश जेठे, नंदकिशोर महाजन, रवी गावडे, महेश सरनाईक, महेश रावराणे, बंटी केनवडेकर, देवयानी वरसकर, बाळ खडपकर, नंदकुमार आयरे, विनोद दळवी, दत्तप्रसाद वालावलकर, संजय वालावलकर, विनोद परब यांच्यासह अनेक पत्रकारांनी या आंदोलनात सहभाग घेतला.